लोणावळा : वर्षाविहाराकरिता आज सकाळपासूनच पर्यटकांनी लोणावळ्यात गर्दी केल्याने लोणावळ्यात रविवारचा दिवसच वाहतुक कोंडीने उजाडली. बारा वाजण्यापुर्वीच भुशी धरण ते लोणावळा कुमार चौक दरम्यान सहा किमी अंतरापर्यत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. राष्ट्रीय महामार्गावर दुतर्फा तिन ते चार किमी अंतरापर्यत दोन ते तिन पदरी वाहनांच्या रांगा लागल्याने अवघ्या दहा ते पंधरा मिनिटांच्या अंतरापर्यत जाण्याकरिता तास ते दिड तासाचा वेळ लागत होता. भुशी धरणापर्यंत पोहचण्याकरीता अडीच ते तिन तास लागू लागल्याने पर्यटकांचा निम्मा दिवस हा वाहतुक कोंडीतच गेला.
कार्ला लेणी व भाजे लेणीकडे जाणार्या मार्गावर देखिल हीच परिस्थिती निर्माण झाली होती. वेहेरगाव ते राष्ट्रीय महामार्ग व मळवली ते राष्ट्रीय महामार्ग अशी कोंडी होत राष्ट्रीय महामार्गावर देखिल लांबच लांब वाहनांच्या रांगा गेल्या होत्या. लोणावळा शहर व येथिल रस्ते याच्या क्षमतेच्या काही पटीने लोणावळ्यात पर्यटक व त्यांची वाहने दाखल झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले होते. लोणावळा शहर पोलीस ही कोंडी सोडविण्याकरिता कसोशिने प्रयत्न करत होते मात्र वाहनांची संख्या अफाट असल्याने पोलीस देखिल हतबल झाले होते.
स्थानिक नागरिकांना आज घराबाहेर पडणे मुश्किल झाल्याने लोणावळेकरांनी संताप व्यक्त करत या वाहतुक कोंडीवर तोडगा काढण्याची मागणी केली.