पिंपरी : जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील चिंचवड येथील एम्पायर इस्टेट पूल ते मोरवाडी चौकापर्यंतच्या रस्त्यावर वाहतूक नियमांचे उल्लंघन करून उभ्या केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यात आली. पिंपरी वाहतूक विभागाच्या वतीने पंचवीस वाहनांना जॅमर लावण्यात आले.जॅमर लावण्यात आलेल्या वाहनांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड वसूल करण्यात आला. नागरिकांनी रस्त्यावर वाहने लावल्यामुळे वाहतुकीला मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या मार्गावर महामेट्रोचे काम सुरू आहे. मेट्रोच्या कामामुळे येथील रस्ता अधिकच अरुंद झाला आहे. तरीही सेवा रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करून सर्रासपणे वाहने उभी केली जातात.चिंचवड येथील मॉलमध्ये जाणारे ग्राहक आपल्या मोटारी आणि दुचाकी ही वाहने रस्त्यावरच उभ्या करतात. त्यामुळे वाहतूककोंडीत भर पडते. रविवार सुटीचा दिवस असल्याने नागरिकांची या रस्त्यावरून वर्दळ असते. रस्त्यात असलेल्या वाहनांमुळे नागरिकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान, रविवारी अशा बेशिस्त वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला.
वाहतुकीस अडथळा; वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2018 4:46 AM