खडकी : खडकी बाजारपेठेत बारा महिने गर्दी असते. सण आणि लग्नसराईच्या काळात, तर बाजारपेठेत गर्दीने ओसंडून वाहत असते. कोठेही बेशिस्तपणे वाहने लावली जात असल्याने अरुंद रस्त्यावर वाहतूककोंडी होत आहे. यामुळे नागरिक वैतागले आहेत. या संदर्भात वारंवार तक्रार करूनही कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि वाहतूक पोलीस कार्यवाही करीत नसल्याचे चित्र आहे. खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची लोकसंख्या ६५ हजारांच्या वर आहे. मोठी बाजारपेठ असल्याने पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरातील नागरिक खरेदीसाठी नियमितपणे खडकीत ये- जा करतात. त्यामुळे बाजारपेठ लोकांनी गजबलेली असते. वाहतूक शिस्तीकडे दुर्लक्ष करीत रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहने लावली जातात. मिळेल त्या जागेत वाहन उभे केले जाते. त्यामुळे वाहतूक संथ होऊन कोंडीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. खडकी बाजारातील पीएमपी स्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, एस. एम. जोशी भवन, सराफ गल्ली, गांधी चौक, पोलीस वसाहत, टांगा स्टॅँड, संजय गांधी भाजी मंडई, जुनी पाण्याची टाकी, फॅक्टरी रस्ता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता, स्व. राजीव गांधी चौपाटी, एमएसईबी चौक आदी परिसरात दुचाकी आणि मोटारी उभ्या केल्या जातात. त्यामुळे वाहतूक कोंडीत भर पडते. वाहतूक पोलिसांकडून कोणतेही कारवाई केली जात नसल्याने या बेशिस्तीत भर पडत आहे. आंबेडकर रस्त्यांवर अनधिकृत फळविक्रेत्यांनी अतिक्रमण केले आहे. हातगाड्या, टेम्पोमुळे आणि खरेदीसाठी थांबणाऱ्या वाहनचालकांमुळे रहदारीस अडथळा होत आहे. वाहतुकीस अडथळा करणाऱ्या बेशिस्त वाहनचालक आणि विक्रेत्यांवर कारवाई करण्याची मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे (आठवले) युवक आघाडीचे खडकी विभागाध्यक्ष अभिजीत गडांकुश यांनी खडकी कॅन्टोन्मेंट बोर्ड आणि वाहतूक पोलीस बोपोडी शाखेकडे केली आहे. (वार्ताहर)
अनधिकृत वाहनतळामुळे खडकी बाजारात वाहतूककोंडी
By admin | Published: March 23, 2016 12:44 AM