पिंपळे गुरव : मागून येणाऱ्या एसटीचा सांगाड्याला (चाशीला) शाळकरी मुलाचे दप्तर अडकले. त्यात जखमी झालेल्या मुलाचे निधन झाले. ही घटना दापोडीत शिवाजी पुतळ्यासमोर मंगळवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास घडली. अनिकेत दीपक शिंदे (वय १६, रा. राजश्री शाहू महाराज कॉलनी, किनारा हॉटेल जवळ, दापोडी) असे मृताचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत भावासोबत सकाळी साडेअकराच्या सुमारास दापोडी येथील मंत्री कॉम्प्लेक्स येथून स्वामी विवेकानंद येथील शाळेत रस्त्याने पायी जात होता. यावेळी शिवाजी पुतळा चौक येथे दोघे जण आले. त्या वेळी वळण मार्गावर मागून येणाऱ्या या एसटीचा सांगाड्याला असलेल्या वाहनाला दप्तर अडकले. त्यामुळे अनिकेत वाहनाच्या डाव्या बाजूच्या मागील चाकाखाली ओढला गेला. त्याच्या डोक्यावरून चाक गेले. काही वेळातच घटनास्थळी पोलीस दाखल झाले. त्वरित गंभीर जखमी अवस्थेत असलेल्या अनिकेतला वायसीएम रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान मृत घोषित करण्यात आले. चालक ज्ञानदेव तुकाराम जावळे (वय ५८, रा. नेवासा नगर) येथून एसटीचा सांगाडा दापोडी येथील एसटी वर्क शॉप येथे घेऊन चालले होते.
भोसरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक बालाजी जोनापल्ले , पोलीस नाईक डी. एल साळवे अधिक तपास करीत आहेत. अनिकेत स्वामी विवेकानंद शाळेत आठवी मध्ये शिक्षण घेत होता. त्याला आई, वडील, मोठी बहीण व लहान भाऊ होते. घरची परिस्थिती गरीबीची होती. आई धुणे भांडी करतात. तर वडील दापोडी येथील सरस्वती अनाथ आश्रमात काम करीत आहेत.