पिंपरी : भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्याची तयारी सुरू झाली आहे. मोरवाडीतील कार्यालयात संगणक बसविण्याचे काम सुरू झाले आहे. संगणक यंत्रणा सज्ज होताच २६ जानेवारीपासून उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरणे, प्रतिज्ञापत्र सादर करणे ही कामे आॅनलाइन करावी लागणार असल्याने पक्षातर्फे उमेदवारांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.मोरवाडी, पिंपरी येथे भाजपाचे संपर्क कार्यालय आहे. त्या ठिकाणी रामकृष्ण राणे, तसेच संजय परळीकर हे पदाधिकारी नियमितपणे निवडणुकीचे कामकाज पाहतात. रोज सकाळी कार्यालय उघडल्यानंतर परिचय पत्रके, तसेच पक्षाचा जाहीरनामा या विषयीची पत्रके कार्यकर्त्यांना वितरित करण्यासाठी बाजूला काढली जातात. पक्षाच्या नियोजन बैठक कोठे असतील, त्याबाबतची माहिती याच कार्यालयातून पदाधिकारी, कार्यकर्ते यांना दिली जाते. कार्यालयात प्रसिद्धिप्रमुख बाबू नायर हेसुद्धा येऊन जातात. बुधवारी ते कार्यालयात आले. निवडणुकीसाठी पक्षाचे बँक खाते उघडण्यासाठी आवश्यक कागदपत्र घेऊन नायर यांची लगबग सुरू होती. उमेदवारांनासुद्धा निवडणुकीसाठी बँक खाते उघडण्याच्या सूचना देण्यात आल्या. भाजपाचे निवडणूक कामकाज अन्य दोन ठिकाणांहून केले जात आहे. मात्र, महत्त्वाची कामे पक्ष कार्यालयातून केली जात आहेत. शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगतापही दुपारी पक्ष कार्यालयात येऊन जातात. दिवसभराच्या कामकाजाचा आढावा घेऊन पुढील कामाचे नियोजन सांगून निघून जातात. २७ जानेवारी ते ३ फेब्रुवारी या कालावधीत नामनिर्देशन पत्र भरण्याची मुदत आहे. त्यामुळे उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरण्याचे प्रशिक्षण देण्यावर पदाधिकाऱ्यांनी भर दिला आहे. पक्ष कार्यालयातच अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. पदाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या कामांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. प्रत्येकाला जबाबदारी चोख सांभाळण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदारयादीच्या प्रभागनिहाय प्रती तयार केल्या जात आहेत. त्या त्या प्रभागातील कार्यकर्त्यांकडे यादीच्या प्रती दिल्या असून, मतदारांशी संपर्कात राहण्याचे नियोजन केले आहे. व्हॉट्स अॅप, फेसबुकवर पक्षाच्या घडामोडी शेअर करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था केली आहे. व्हॉट्स अॅप ग्रुप तयार करून वेळोवेळी माहिती पाठवली जात आहे. (प्रतिनिधी)
आॅनलाइन अर्जासाठी प्रशिक्षण
By admin | Published: January 26, 2017 12:22 AM