नारायण बडगुजर, लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपरी: राज्य पोलिस दलातील उपअधीक्षक / सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या सोमवारी (दि. २२) बदल्या करण्यात आल्या. त्या बदल्यांमध्ये अंशत: बदल करण्यात आले. त्यात पिंपरी-चिंचवडच्या सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची करण्यात आलेली बदली रद्द झाली आहे. राज्याच्या गृह विभागातर्फे याबाबत बुधवारी (दि. २४) आदेश काढण्यात आले आहेत.
राज्याच्या गृह विभागातर्फे सोमवारी (दि. २२) पोलिस उपअधीक्षक/सहायक आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्यात पिंपरी -चिंचवड शहरातील तीन सहाय्यक पोलिस आयुक्तांच्या बदल्या झाल्या. यामध्ये गुन्हे शाखेचे प्रशांत श्रीराम अमृतकर यांची पोलीस उपअधीक्षक गडचिरोली येथे बदली झाली. तर वाकड विभागाचे सहाय्यक पोलिस आयुक्त श्रीकांत औदुंबर डिसले यांची पोलीस उपअधीक्षक नंदुरबार येथे बदली झाली. तसेच चाकण विभागाच्या सहाय्यक पोलीस आयुक्त प्रेरणा जीवन कट्टे यांची पोलीस उपअधीक्षक चिमूर, जि. चंद्रपूर येथे बदली करण्यात आली होती. मात्र, कट्टे यांची बदली रद्द करण्यात आली असून, त्यांच्या पदस्थापनेचे आदेश स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहेत.
सहायक पोलीस आयुक्त प्रेरणा कट्टे यांची २०२० मध्ये नागपूर शहर येथून बदली करण्यात आली. मात्र त्यांना बदलीचे ठिकाण देण्यात आले नव्हते. ९ ऑक्टोबर २०२० रोजी गृह विभागाने काढलेल्या बदल्यांच्या आदेशात प्रेरणा कट्टे यांची पिंपरी-चिंचवड शहरात बदली झाली.
‘लोकमत’ने केले होते वृत्त प्रसिद्ध
तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांची १२ मे रोजी भर दिवसा हत्या झाली. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली. सहायक पोलिस आयुक्त प्रेरणा कट्टे या एसआयटीच्या प्रमुख होत्या. मात्र, कट्टे यांची चंद्रपूर येथे बदली झाल्याने आवारे हत्या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जाणार, याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत ‘लोकमत’ने सविस्तर वृत्त प्रसिद्ध केले होते. मात्र, प्रेरकणा कट्टे यांची बदली तुर्तास रद्द करण्यात आल्याने या प्रकरणाचा तपास कट्टे यांच्याकडेच राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.