पिंपरी : मागील काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील अंतर्गत बदल्यांची चर्चा सुरू होती. अखेर सोमवारी (दि. ३) रात्री उशिरा बदल्यांचे आदेश काढण्यात आले. त्यानुसार सहा पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी याबाबतचे आदेश दिले.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत १८ पोलीस ठाणे आहेत. यातील काही पोलीस ठाण्यांच्या प्रभारींचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तसेच काहींचा कार्यकाळ पूर्ण होत आला आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांच्या बदल्या होणार, अशी चर्चा सुरू होती. तसेच राज्यातील काही पोलीस निरीक्षकांना सहायक आयुक्त/उप अधीक्षक अशी पदोन्नतीने बदली करण्यात येणार आहे. त्यासाठी संबंधित पोलीस निरीक्षकांकडून आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करण्यात आली आहे. मात्र, वरिष्ठ पातळीवरून अद्याप या पदोन्नतीचे आदेश काढण्यात आलेले नाहीत. या पदोन्नतीमुळे पिंपरी-चिंचवड शहर पोलीस दलातील सहा अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. त्यांना पदोन्नती मिळाल्यास त्यांच्या रिक्त जागी देखील नव्याने पोलीस निरीक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे शहर दलांतर्गत आणखी काही निरीक्षकांच्या बदल्या होणार आहेत.
बदली झालेले अधिकारी (कुठून कुठे)दिलीप शिंदे (दिघी पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)वर्षाराणी पाटील (देहूरोड पोलीस ठाणे ते वाहतूक शाखा)ज्ञानेश्वर काटकर (गुन्हे शाखा युनिट एक ते चिखली पोलीस ठाणे)मच्छिंद्र पंडीत (गुन्हे शाखा युनिट चार ते दिघी पोलीस ठाणे)वसंत बाबर (चिखली पोलीस ठाणे ते महाळुंगे पोलीस ठाणे)ज्ञानेश्वर साबळे (महाळुंगे पोलीस ठाणे ते देहूरोड पोलीस ठाणे)