देहूगाव : तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांर्तगत सुरु असलेली नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर सुरळीत पाणी पुरवठा होऊ लागल्यानंतर ग्रामपंचायतीच्या सदस्यांना या योजनेची संपुर्ण माहिती व प्रशिक्षण दिल्यानंतरच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणने देहू ग्रामपंचायतीकडे हस्तांतरीत करावी असा ठराव ग्रामसभेत ग्रामस्थानी एकमताने मंजूर केला. या ठरावाची माहिती तातडीने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला कळविण्यात येणार आहे. असे असले तरी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून सोमवार दि. १९ मार्चपासून पाणी पुरवठा बंद करण्यात येणार असल्याने ग्रामस्थांपुढील पेच कायम आहे. जीवन प्राधिकरण या वर काय भूमिका घेते या कडे ग्रामस्थांचे लक्ष आहे. याच प्रश्नावर चर्चा करण्यासाठी रविवारी सकाळी हनुमान समाज मंदीरात ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामसभा सरपंच सुनिता टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. ग्रामसेवक गणेश वाळकोळी, उपसरपंच दिनेश बोडके, सदस्यासह ग्रामसभेस ग्रामस्थ उपस्थीत होते. एकमताने नवीन पाणी पुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतरच ग्रामपंचायतीने ताब्यात घ्यावी असा ठराव मंजूर करण्यात आला. हा ठराव केला असला तरी देहूकरांचा सध्या पाणी पुरवठा थांबविला जाणार हे निश्चित आहे. यावर सध्या काहीही तोडगा दृष्टीपथास येत नाही. यावर आमदार संजय भेगडे यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री, पालक मंत्री, पाणी पुरवठा मंत्री यांची शिष्ट मंडळ भेट घेणार आहे. (वार्ताहर)
नवीन योजना पूर्ण झाल्यानंतरच हस्तांतरण
By admin | Published: March 20, 2017 4:23 AM