पिंपरी : दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये अवैध दारू वाहतूक तसेच विक्री प्रकरणी राज्य उत्पादन शुल्कच्या (एक्साइज) तळेगाव दाभाडे विभागाने कारवाई केली. यात एक लाख ५३ हजार ६५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
शिरगाव येथे केलेल्या कारवाईत नीलेश ज्ञानेश्वर पवार (३५, रा. गोडुंब्रे, ता. मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला. एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ मे रोजी शिरगाव येथे गहुंजे रस्त्यावर अवैध गावठी दारूची वाहतूक होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी एक संशयित चारचाकी वाहन थांबवले. वाहनामधून ३५ लिटरच्या आठ प्लास्टिक कॅनमध्ये २८० लिटर गावठी दारू जप्त केली. यात एकूण एक लाख ४८ हजार ८०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
दुसऱ्या कारवाईत खेड तालुक्यातील वासुली गावच्या हद्दीतील हॉटेल राजदरबार येथे अवैधरित्या देशी-विदेशी मद्याची विक्री होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साइजच्या तळेगाव दाभाडे पथकाने छापा मारला. यात अवैध देशी-विदेशी मद्याची विक्री सुरू असल्याचे आढळून आले. यामध्ये चार हजार ८५५ रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. यामध्ये राजेश दगडोबा घोनशेठवाड (४२, रा. हॉटेल राजदरबार, वासुली, ता. खेड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला.
एक्साइजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत, उपअधीक्षक सुजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक प्रवीण गाडगे, प्रशांत रुईकर, सहायक दुय्यम निरीक्षक रवि लोखंडे, जवान शिवाजी गळवे, रसूल काद्री, अविनाश दिघे, प्रदीप गवळी, अमोल अन्नदाते यांच्या पथकाने ही कारवाई केली.