पिंपरी : चारचाकी वाहनातून गावठी दारुचे वाहतूक करणाऱ्यांवर राज्य उत्पनादन शुल्क विभागाकडून रविवारी (दि.२२) कारवाई करण्यात आली. पिंपरी आणि थेरगाव या दोन ठिकाणी कारवाईमध्ये ३८५ लिटर हातभट्टी दारू तसेच वाहतूकीसाठी वापरणारी कार असा दोन लाख ३० हजार ३९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
मिळालेल्या माहितीनुसार, कारमधून गावठी दारुची वाहतूक होत असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार सापळा रचून राज्य उत्पादन शुल्कच्या पथकाने दोन कारवर कारवाई केली. या कारवाईमध्ये २० हजार रुपये किंमतीची ३८५ लिटर गावठी दारु तसेच दोन लाख १० हजार रुपये किंमतीची कार पोलिसांनी जप्त केली. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे दुय्यम निरीक्षक नारायण मुंजाळ, प्रकाश सेतसंधी,सहाय्यक दुय्यम निरीक्षक, स्वप्नील दरेकर तसेच महेंद्र कदम, जी. के.सोळंके, एन यु जाधव यांच्या पथकाने केली.