पिंपरी : बेकायदेशीर विक्रीसाठी वाहतूक होत असलेला मद्यसाठा जप्त केला. विविध ब्रँडच्या उच्च प्रतीच्या दारुच्या ५० बाटल्या तसेच चारचाकी वाहन असा एकूण २३ लाख १५ हजार ३३० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पुणे येथील राज्य शुल्क उत्पादन विभागाच्या (एक्साईज) भरारी पथक क्रमांक १ यांच्याकडून लोणावळा येथे मंगळवारी (दि. ६) ही कारवाई करण्यात आली.
बापू विठ्ठल आहेर व सुनील रामचंद्र कदम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुणे एक्साईजचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा हद्दीत अवैधपणे उच्च प्रतीचे विदेशी मद्य बाळगून विक्रीच्या हेतूने वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार एक्साईजचे उपअधीक्षक सुजित पाटील, उत्तम शिंदे व एस. बी. जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथक क्रमांक एकचे निरीक्षक देवदत्त पोटे यांच्या पथकाने लोणावळा शहर हद्दीतील तुंगार्ली येथील गोल्ड व्हॅल्ली रस्त्यावर द लगुना रिसॉर्टच्या जवळ मंगळवारी संशयित वाहनांची तपासणी केली. त्यावेळी एका चारचाकी वाहनातून बापू आहेर आणि सुनील कदम हे दोघे बेकायदेशीर विक्रीसाठी मद्याची वाहतूक करताना आढळून आले. त्यांच्याकडून विविध कंपन्यांच्या ब्रँडचे उच्च प्रतीच्या मद्याच्या ५० बाटल्या तसेच चारचाकी वाहन असा एकूण २३ लाख १५ हजार ३३० रुपयांचा मद्यसाठा जप्त केला.
एक्साईजच्या ब विभागाचे निरीक्षक विठ्ठल बोबडे, तळेगाव दाभाडे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक बी. एस. घुगे, डी. एस. सूर्यवंशी तसेच जवान सुरज घुले, जयराम काचरा, शाहीन इनामदार, मुकुंद पोटे, चंद्रकांत नाईक, शरद हांडगर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
बेकायदेशीर विक्रीसाठी मद्य साठवणे, बाळगणे तसेच वाहतूक करणे कायद्याने गुन्हा आहे. अवैध मद्याबाबत कोणास माहिती मिळाल्यास तात्काळ एक्साईजच्या पुणे विभागाशी संपर्क साधावा. तत्काळ कारवाई करण्यात येईल.- चरणसिंग राजपूत, अधीक्षक, एक्साईज, पुणे