पिंपरी : गावठी दारुची टेम्पोमधून होणाऱ्या अवैध वाहतुकीचा पर्दाफाश करत राज्य उत्पादन शुल्क (एक्साइज) विभागाच्या पथकाने दारुची हातभट्टी उद्ध्वस्त केली. यात टेम्पोसह सहा लाख ४१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
अर्जुन बिरबल राठोड (३७,रा. ईनाम वस्ती, शेल पिंपळगाव, ता. खेड) याला याप्रकरणी अटक करण्यात आली. एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक संजय सराफ यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक्साइजचे पथक रात्र गस्तीवर असताना माहिती मिळाली की, गावठी दारुची टेम्पोमधून वाहतूक होणार आहे. त्यानुसार गुरुवारी पहाटे तीनच्या सुमारास चाकण पोलिस ठाण्याच्या हद्दीतील, चाकण-शिक्रापूर रस्त्यावर बोसे गावाच्या हद्दीत एक्साइजच्या पथकाने सापळा लावला. त्यावेळी एक संशयित पिकअप टेम्पो दिसला. त्या वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये अर्जून राठोड हा अवैध गावठी दारूची वाहतूक करत असल्याचे समोर आले. त्याच्या टेम्पोमध्ये गावठी दारुचे १९ हजार ८०० रुपये किमतीचे प्लास्टिक कॅन मिळून आले. गावठी हातभट्टी दारू कोठून आणली, अशी राठोड याच्याकडे चौकशी केली. मी स्वत: गावठी हातभट्टी दारूची निर्मिती करतो, असे त्याने पथकाला सांगितले. त्याला घेऊन गावठी हातभट्टी निर्मिती ठिकाणाची तपासणी केली असता तेथे गावठी हातभट्टी दारू निर्मितीचे एक हजार लिटर क्षमतेचा एक लोखंडी बॅरल, रसायनाने भरलेले ५०० लिटर क्षमतेचा एक लोखंडी बॅरल रिकामा तसेच इतर साहित्य मिळून आले. या कारवाईत वाहनासह एकूण सहा लाख ४१ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.
एक्साइजच्या तळेगाव दाभाडे विभागाचे निरीक्षक संजय सराफ, दुय्यम निरीक्षक पी. आर. गाडगे, पी. जी. रुईकर, सहायक दुय्यम निरीक्षक आर. सी. लोखंडे, जवान आर. ए. काद्री, एस. डी. गळवे, पी. पी. गवळी, ए. के. दिघे, अमोल अन्नदाते यांच्या पथकाने ही कामगिरी केली.