पिंपरी :औद्योगिकनगरीत कोरोनाचा विळखा सैल झाल्याने कोविडसाठी समर्पित असणारे संत तुकाराम नगर येथील यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील ५० टक्के भागात नॉन कोविड रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत, अशी माहिती महापौर उषा ढोरे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
ऑक्टोबरच्या पहिल्या दिवसापासून कोरोनाचा विळखा सैल होत आहे. त्यामुळे पहिले टप्प्यामध्ये शहरातील सुरू असणारी १९ कोविड सेंटर पैकी १६ सेंटर बंद केले आहेत. तसेच वायसीएम रुग्णालय हे कोविडसाठी समर्पित असल्याने नॉन कोविड रुग्णांना उपचारासाठी अडचणी येत होत्या. रुग्ण संख्या कमी झाल्याने हे रुग्णालय नॉन कोविड करण्यात यावी, अशी मागणी होत होती. त्यानुसार महापालिका प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली आणि वायसीएम रुग्णालयातील पन्नास टक्के भाग नॉन कोविडसाठी खुला करण्यात येणार असल्याचे आज जाहीर करण्यात आले.
महापौर उषा ढोरे म्हणाल्या, '' रुग्ण संख्या कमी झाल्याने वायसीएम रुग्णालयातील ५० टक्के भागात नॉन कोविडरुग्णांवर उपचार करण्यासाठी उपलब्द्ध करण्यात येणार असून मंगळवारपासून त्याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. गोरगरिबांसाठी वायसीएम रुग्णालय हे जीवनदायिनी असल्याने नॉन कोअर रुग्णांना व उपचारासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.