पिंपरी : भोसरी, एमआयडीसी भागातील ब्लॉक एफ - येथील एका खासगी बंद कंपनीच्या आवारातील जुनी व मोठी झाडी तोडण्यात आली आहेत. तसेच, पदपथावरीलही झाडे तोडण्यात आली आहेत. त्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उद्यान विभागाची कोणतीही परवानगी घेण्यात आलेली नाहीत. हा प्रकार बुधवारी (दि. १६) सायंकाळी उघडकीस आला. मात्र, गुन्हा नोंद करण्यास तब्बल १२ तास लागल्याने पर्यावरणप्रेमींकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
वृक्षतोड करून लाकडे (एमएच १४ व्ही ४६१४ ) क्रमांकाच्या ट्रकमधून नेण्यात येत होती. त्यावेळी वृक्षप्रेमी प्रशांत राऊळ, राहुल घोलप, माणिक धर्माधिकारी, सागर वाघ या निसर्गराजा मित्र जीवाचे या संस्थेच्या सदस्यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाच्या निदर्शनास आणून दिली.
त्यांनतर उद्यान विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पंचनामा करून भोसरीएमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार भोसरी एमआयडीसी पोलिसांनी सुरेश बजाज ( कटकास्ट कंपनी एफ-२, भोसरी एमआयडीसी) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पंचनाम्यानुसार कंपनीच्या आवारातील मोठी दोन झाडे व पदपथावरील ६ झाडे तोडण्यात आल्याचे नमूद केले. तसेच लाकडे भरलेला ट्रक ताब्यात घेण्यात आला आहे.
विनापरवाना झाडे तोडल्यास फौजदारी करणार
विनापरवाना वृक्ष तोड करणाऱ्या नागरिक व संस्थांवर फौजदारी कारवाई केली जाणार आहे. त्यात कोणाला अभय दिले जाणार नाही. सुट्टीच्या दिवशी वृक्षतोड जास्त होत आहे. -रविकिरण घोडके, उपायुक्त, महापालिका