पिंपरी : निवडणूक काळ अनेक कारणांसाठी महत्त्वाचा मानला जातो. निवडणूक काळात मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाल होत असते. पैसे कमावण्याची संधी म्हणून निवडणूक कालावधीचा फायदा उठविणारे अनेक जण आहेत. निवडणूक लढण्याचे, तंत्र, नियोजन, प्रसार यासाठी जे आवश्यक ते सर्व काही उपलब्ध करून देऊ, अशा प्रकारचे आमिष दाखविणारे अनेक धंदेवाईक पुढे येऊ लागले आहेत. अशा धंदेवाईक संस्थांचे शहरात पेव फुटले आहे. महापालिका निवडणुकीचे आरक्षण आणि प्रभाग रचना शुक्रवारी ७ सप्टेंबरला जाहीर झाले. चिंचवड येथील प्रेक्षागृहात आरक्षण सोडतीचा कार्यक्रम झाला. त्या वेळी पे्रक्षागृहाबाहेर निवडणूक प्रचार यंत्रणा कशी राबवावी, प्रचारात सोशल मीडियाचा वापर यासंबंधी सर्व काही उपलब्ध करून देणारी यंत्रणा सज्ज आहे. अशी पत्रके वाटप केली जात होती. मतदार सर्वेक्षण, छपाई, मतदार यादीनुसार मतदारांशी संपर्क साधण्याचे सॉफ्टवेअर, सोशल मीडिया, कार्यक्रमांचे आयोजन, मोबाइल अॅप्स, व्हॉट्स अॅप, फेसबुक मनुष्यबळ उपलब्ध करून देणे यांसह निवडणुकीसाठी जे हवे, ते सर्व काही देणार, अशा पद्धतीने संबंधित धंदेवाईक संस्थांचे प्रतिनिधी इच्छुकांच्या संपर्कात येऊ लागले आहेत. थोडक्यात म्हणजे पैसे मोजण्याची तयारी ठेवा, आम्ही निवडणूक लढण्यासाठी आवश्यक ते सर्व काही उपलब्ध करून देऊ, अशा स्वरूपाचा धंदेवाईक संस्थांचा प्रस्ताव आहे. (प्रतिनिधी)
निवडणुकीसाठी धंदेवाईक संस्थांचे फुटले पेव
By admin | Published: October 09, 2016 4:32 AM