देहूरोड : मुंबई -पुणे राष्ट्रीय महामार्गावरील देहूरोड येथील सहायक पोलीस आयुक्त कार्यालयाजवळच्या जंगलात किवळे येथील एका कपडे व्यावसायिकाला ‘तुम बाहरसे आकर इतना कमाते हो’ असे म्हणून ‘जान प्यारी है तो एक लाख रुपये लाकर दो’ असे म्हणून तिघांनी खंडणी मागितल्याचा प्रकार घडला आहे. संबंधित तिघांना कोयत्यासह ताब्यात घेतले असून त्यांच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनीष कल्याणकर यांनी सांगितले.
आकाश नंदकुमार मिश्रा (वय २४, रा. किवळे) या कपडे व्यावसायिकाने याप्रकरणी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, संकल्प संजय पगारे (वय १९, रा. मामुर्डी), योगेश किसन बुरकुंडे (वय २१, रा. आदर्शनगर, किवळे) आणि शुभम शांतीलाल चव्हाण (वय २०, रा. यशवंतनगर, तळेगाव दाभाडे) अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत.
देहूरोड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार आकाश मिश्रा यांना आरोपींनी फोन करून सोमाटणे येथे भेटायला बोलावले होते. मात्र त्यांनी नकार दिल्याने देहूरोड येथे शनिवारी सकाळी साडेअकराला येण्यास सांगितले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी मिश्रा यांना देहूरोड येथील सहायक आयुक्त कार्यालयाच्या मागे असलेल्या जंगलात घेऊन गेले. तेथे शुभम चव्हाण अगोदरच उपस्थित होता. चव्हाण याने ‘तुम बाहरसे आकर इतना कमाते हो’ असे म्हणून ‘जान प्यारी है तो एक लाख रुपये लाकर दो’ असे म्हणून खंडणी मागितली. त्याचे हातात एक कोयता होता. त्यांनी जीवे मारण्याची धमकी देत एक लाखाची खंडणी मागितली. त्यामुळे धमकीला घाबरून त्यांनी पैसे आणून देतो, असे सांगून मित्रासह देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.