लोकमत न्यूज नेटवर्करावेत : दिवसेंदिवस शहराच्या तापमानात वाढ होत आहे. त्यातच वाल्हेकरवाडी, रावेत परिसरात वारंवार होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. भारनियमन जाहीर करीत असताना शासनाने पिंपरी-चिंचवडला वगळले असताना वाल्हेकरवाडी आणि रावेतकरांच्या वाट्याला मात्र गेल्या काही दिवसांपासून भारनियमनाला सामोरे जावे लागत आहे. वाल्हेकरवाडी परिसरातील भोंडवेनगर, एकवीरा कॉलनी, चिंतामणी चौक, आहेरनगर, रजनीगंधा सोसायटी, शिवाजीनगर, वाल्हेकरवाडी गावठाण, तसेच रावेत परिसरातील बहुतांश भागात वारंवार विद्युतपुरवठा खंडित होत आहे. महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका नागरिकांना विनाकारण सहन करावा लागत आहे. अघोषित भारनियमनाने नागरिकांची झोप उडाली आहे. ऐन उन्हाळ्यात नागरिकांना उकाड्याचा त्रास सहन करावा लागत आहे. परिसरातील सर्व वीज वाहिन्या भूमिगत असूनदेखील ही परिस्थिती आहे. दररोज होणाऱ्या खंडित वीजपुरवठ्यामुळे महावितरणचा भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.कर्मचाऱ्यांवर येथील अभियंत्यांचा वचक राहिला नसल्याने या कर्मचाऱ्यांची मनमानी सुरू आहे, असे नागरिकांचे म्हणणे आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यावर परिसरातील नागरिकांनी महावितरणकडे तक्रार करूनही काही उपयोग होत नाही. तक्रारीची दखल घेतली जात नाही. कार्यालयातील फोन बंद किंवा बिझी ठेवणे त्यामुळे नागरिकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. कर्मचारी वेगवेगळी कारणे देत असतात.अचानकपणे काही वेळा केबल जळत असल्यामुळे वीजपुरवठा खंडित होतो. पहाटेच्या वेळी वाल्हेकरवाडी मार्गावरील आहेरनगर येथील केबल जळल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला होता. परंतु ताबडतोब युद्धपातळीवर काम करून वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला आहे. - संतोष झोडगे, कार्यकारी अभियंता, महावितरण, बिजलीनगर महावितरणकडून रावेत परिसरात अघोषित भारनियमन सुरू झाले आहे. वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले आहे. फोन केल्यास फोन उचलला जात नाही अथवा कर्मचारी प्रतिसाद देत नाहीत. वीजपुरवठा सुरळीत कधी होणार अशी विचारणा केल्यावर उत्तर देण्यास कर्मचारी टाळाटाळ करतात.- दीपक भोंडवे, सामाजिक कार्यकर्ते
खंडित वीजपुरवठ्याचा त्रास
By admin | Published: May 08, 2017 2:33 AM