- हनुमंत देवकर चाकण - खराबवाडी ( ता.खेड ) येथील वाघजाईनगर मधील ट्राई वॉल पॅक प्रा. लि. या कागदी पुठ्ठयाचे उत्पादन करणाऱ्या कंपनीला आकस्मिकपणे आग लागून आगीत मशिनरी, कच्चा माल व इतर सामुग्री खाक होऊन अंदाजे साडेचार ते पाच कोटीचे नुकसान झाल्याची माहिती कामगार तलाठी शाम वालेकर यांनी दिली. वीस तासानंतर आग आटोक्यात आली. महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त कंपनीला सुट्टी असल्याने सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मंगळवारी ( दि. १ मे ) रोजी सकाळी आठ वाजता वाघजाई नगर येथील जमीन गट नंबर ३५७ मधील ट्राई वॉल पॅक प्रा. लि. या कंपनीला आकस्मिकपणे आग लागली. आग लागताच खराबवाडीचे माजी सरपंच हनुमंत कड, उद्योजक जीवन खराबी व लोकमतचे स्थानिक वार्ताहर हनुमंत देवकर यांनी त्वरित फायर ब्रिगेडला संपर्क केला. चाकण एमआयडीसी, फोक्सवॅगन, बजाज ऍटो, राजगुरूनगर नगरपरिषद यांचे एकूण सहा आगीचे बंब, पाण्याचे वीस टँकर्स, स्थानिक नागरिकांच्या सहकार्याने सलग वीस तास आग विझविण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. या आगीत एक कोटीचा कच्चा माल, तीन कोटींच्या मशिनरी, व एक कोटीपर्यंत बांधकाम स्ट्रक्चर आगीत जळून खाक झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी एकूण सात लाख लिटर पाण्याचा वापर करण्यात आला. हे शेड ठाण्याचे पोलीस निरीक्षक कल्याण पवार यांच्या पत्नी ज्योती यांच्या नावावर असून १८ हजार स्क्वेअर फूट बांधकाम असलेल्या या कंपनीत कागदी पुठ्ठयाचे उत्पादन केले जाते. घटनास्थळी नायब तहसीलदार कानसकर व चाकणचे मंडलाधिकारी बाबासाहेब साळुंके यांनी भेट देऊन नुकसानीची पाहणी केली. तलाठी शाम वालेकर यांनी स्वतः फायर ब्रिगेडमार्फत आग विझविण्यास मदत करून झालेल्या नुकसानीचा पंचनामा केला. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही.
खराबवाडीत ट्राई वॉल पॅक कंपनीला आग लागून कोट्यवधींचे नुकसान
By ऑनलाइन लोकमत | Published: May 02, 2018 8:48 PM