पिंपरी : वाहतूक नियमन करताना चारचाकी वाहन अडविले म्हणून वाहतूक विभाग पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर वाहन घातले. तसेच मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलावतो मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देऊन वाहनचालक पोलीस अधिकाऱ्याच्या अंगावर धावून गेला. निगडी येथे बुधवारी (दि. १६) सकाळी सव्वा अकराच्या सुमारास हा प्रकार घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल नामदेव चव्हाण (वय ४०, रा. शिंदेवस्ती, रावेत) असे आरोपीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केले आहे. याप्रकरणी निगडी वाहतूक विभागाचे पोलीस उपनिरीक्षक संजय विष्णू जाधव (वय ५४) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फियार्दी जाधव बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास निगडी येथील लोकमान्य टिळक चौकात वाहतूक नियमन करीत होते. वाहतूक सुरळीत होण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. त्यावेळी आरोपी चव्हाण त्याच्या चारचाकी वाहनातून जात असताना त्याला वाहन थांबविण्याचा इशारा केला.
मात्र चव्हाण याने पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या अंगावर गाडी घातली. तसेच गाडीचा वेग कमी न करता जाधव यांना रस्त्याने फरपटत नेऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. जाधव यांच्या कायदेशीर कर्तव्यामध्ये अडथळा निर्माण करून धाकाने परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. तुम्ही माझीच गाडी का अडवली, असे म्हणून तुम्ही आमचेवर दादागिरी करताय, तुमची गुंडशाही चाललीय, मी आता लगेच आमचे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते बोलावतो, मग तुम्हाला समजेल मी कोण आहे ते, अशी धमकी देऊन आरोपी चव्हाण हा फिर्यादी पोलीस उपनिरीक्षक जाधव यांच्या अंगावर धावून गेला. निगडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) राजेंद्र निकाळजे तपास करीत आहेत.