देहूगाव: संतश्रेष्ठ तुकोबारायांचा पालखी सोहळा रविवारी सकाळी देहूतून पंढरीकडे मार्गस्थ झाला आहे. सावल्यांचा खेळ अनुभवत आणि हरिनामाचा अखंडपणे गजर करत पालखी सोहळा वारीची वाट चालू लागला आहे.
इंद्रायणी तीरावरील देहू नगरीमध्ये शनिवारी सायंकाळी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याने आषाढी वारीसाठी प्रस्थान ठेवले होते. मंदिर प्रदक्षिणा करून पालखी सोहळा इनामदार वाड्यात विसावला होता. त्यानंतर रविवारी सकाळी परंपरेनुसार पूजा करण्यात आली. सकाळी साडेआठ वाजता शासकीय महापूजा संपन्न झाली . जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य अधिकारी चंद्रकांत वाघमारे, पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त विनय कुमार चोबे, देहू देवस्थानाचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे सोहळा प्रमुख संजय महाराज मोरे, अजित महाराज मोरे, भानुदास महाराज मोरे, माणिक महाराज मोरे आदी विश्वस्त उपस्थित होते.
त्यानंतर सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास देहुगावच्या प्रवेशद्वारकामानीतून प्रदक्षिणा घालून अनगड शहावली बाबा यांच्या दर्ग्याजवळ सोहळ्यातील पहिला विसावा झाला. अभंग आरती झाली. यावेळी भंडारा डोंगर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद उपस्थित होते. त्यानंतर तुकोबारायांचा सोहळा आकुर्डी येथील मुक्कामासाठी मार्गस्थ झाला. वातावरणात उकाडा जाणवत आहे. तसेच उन्हाची तीव्रता ही जाणवत आहे. उन्हाची तमा न बाळगता वारकरी वारीची वाट चालत आहेत.