पुणे : शहरात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली. पावसामुळे संपूर्ण शहरात पाण्याची तळी साचली होती. पावसाळी कामे पूर्ण होत असल्याचा दावा करणाऱ्या महापालिका प्रशासनाचा फोलपणा पुन्हा एकदा उघड झाला आहे. या पावसामुळे शहरातील सर्व प्रमुख चौकांसह अनेक रस्त्यांवर पाणी साचले होते. त्यामुळे एकाच पावसाने शहराची अशी अवस्था केली असेल, तर पावसाळ््याचा सामना महापालिका कसा करणार? असा सवाल उपस्थित होत आहे.महापालिका प्रशासन तसेच पदाधिकाऱ्यांकडून गेल्या महिनाभरापासून शहराच्या पावसाळी कामांचा आढावा घेण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे. तर, दुसरीकडे महापालिका प्रशासनाकडून पावसाळी कामे तातडीने सुरू असल्याचा दावा केला जात होता. मात्र, हा दावा या पावसाने फोल ठरवला असून, पहिल्याच पावसात शहर तुंबले आहे. त्याचा थेट फटका सायंकाळी परतीच्या मार्गावर असलेल्या पुणेकरांना बसला. पावसाच्या पाण्याची तळीच रस्त्यावर साचल्याने नागरिकांना त्यातून रस्ता काढण्यासाठी कसरत करावी लागत होती. (प्रतिनिधी)
शहर तुंबले..!
By admin | Published: May 14, 2015 4:20 AM