वाकड : अमली पदार्थविरोधी पथकाने वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना संशयितरीत्या आढळलेल्या टेम्पोचा पाठलाग केला. या वेळी तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. पथकाने ही कारवाई गुरुवारी दुपारी केली.याप्रकरणी विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय २९, रा. वैभवनगर, पिंपरी) या चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडील गुटखा व एमएच १२, एमव्ही १४६३ या क्रमांकाचा टेम्पो हस्तगत केला आहे. याबाबतची माहिती अशी, अमली पदार्थविरोधी पथक, गुन्हे शाखा पथकाकडून वाकड हद्दीत गुटखा विक्री व अमली पदार्थ तस्करी करणाऱ्यांना जरब बसावी. यासाठी पोलीस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्या मार्गदर्शनाखाली पथक वाकड हद्दीत गस्त घालत होते. त्या वेळी एक टेम्पो संशयितरित्या आढळून आला. त्याचा शिताफीने पाठलाग करून झडती घेतली असता त्यात गुटखा आढळला.
टेम्पोत गुटखा आढळल्याने अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी व निरीक्षकांना बोलावून घेत गुन्हा दाखल करण्यात आला. टेम्पोत तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला. उपनिरीक्षक वसंत मुळे, हवालदार प्रदीप शेलार, राजन महाडिक, रमेश भिसे, प्रसाद जंगीलवाड, बि. के. दौंडकर, बाळासाहेब सूर्यवंशी, टी. डी. घुगे, आर. डी़ बांबळे, ए. डी. गारगोटे, प्रदीप गुट्टे यांनी कारवाई केली.