पिंपरी : अंगणवाडी सेविकांच्या राज्यव्यापी संपामुळे शहरातील हजारो बालके आणि स्तनदा मातांना पोषण आहाराला मुकावे लागत आहे. शहरातील ३६१ केंद्रापैकी फक्त ६ अंगणाड्या सुरू आहेत. त्यामुळे स्तनदा माता व चिमुकल्यांना पोषण आहार मिळत नाही. हा संप अधिक लांबल्यास कुपोषित बालकांच्या आरोग्यावर त्याचा गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे. राज्य शासनाच्या एकात्मिक बाल विकास आयुक्तालयाकडून अंगणवाडी केंद्रात पोषक आहार दिला जातो. मात्र, अंगणवाडी सेविका ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर आहेत. त्यामुळे अंगणवाड्यांना नियमित पोषण आहार मिळालेला नाही. शहरात ३६१ पेक्षा अधिक अंगणवाड्या असून यामध्ये सुमारे २० हजार बालके आहेत. ही बालके प्रामुख्याने गरीब घरातील आहेत. संप काळात या बालकांना पोषण आहार पुरविण्याबाबत कोणतीही पर्यायी व्यवस्था नसल्यामुळे त्यांचे हाल सुरू आहेत. तीन ते ६ वयोगटातील बालकांना नियमित पोषण आहारसोबतच संस्काराचे धडे दिले जातात. त्यांना अक्षरओळख करून दिली जाते. तसेच मनोरंजनात्मक गीते व कविता शिकवल्या जातात. त्यामुळे चिमुकल्यांचा सर्वांगिण विकास होण्यास मदत होते. मात्र, अंगणवाड्यांना टाळे लागल्याने चिमुकल्यांची गैरसोय झाली आहे.
आहारामध्ये या पदार्थांचा समावेश
दररोजच्या वेळापत्रकानुसार लापशी, खिचडी, उसळ, वरण-भात, पुलाव आणि उपीट असा गरम व ताजा आहार दिला जातो. मात्र, सध्याच्या संपामुळे झोपडपट्टी भागातील बालकांना हा आहार मिळत नाही.
कुपोषित बालकांमध्ये वाढ होण्याची शक्यता
शहरामध्ये कामा-धंद्यांच्या निमित्ताने गरीब कुटुंबे स्थायिक झाली आहेत. तसेच गरोदर माता, स्तनदा माता व नवीन वर्षांच्या आतील कुपोषित बालकांना घरपोच पौष्टिक आहार दिला जातो. मात्र, हा आहार बंद झाल्याने कुपोषित बालकांची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे.
अंगणवाडी सेविका आणि मदतनीस संपावर आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांचे हाल होत आहेत. लवकरच तोडगा काढल्यावर प्रश्न सुटू शकेल. सध्या आहार बनविणे बंद आहे. - प्रशांत राऊत, कनिष्ठ सहाय्यक, अंगणवाडी प्रकल्प