पिंपरी : सायंकाळी आणि रात्री अशी दोनदा रेकी करून घरफोडी करणाऱ्या टोळीला बेड्या ठोकल्या. सुसगावातील घरफोडी करून अवघ्या दोन मिनिटांमध्ये चोरट्यांनी ११९ तोळे सोने आणि दोन लाख ९० हजार रुपये रोकड चोरून नेली. याप्रकरणी महाराष्ट्र आणि गुजरात येथून तिघांना अटक केली. त्यांच्याकडून ७१ तोळे सोने आणि आठ लाखांची रोकड जप्त केली.
अजय सर्जा नानावत (वय २७, रा. मुळशी), कन्हैया विजय राठोड (वय १९, रा. पाथरगाव, ता. मावळ), आशा राजूभाई ठक्कर (वय ४०, रा. अहमदाबाद, गुजरात) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. मोहन, अनिरुद्ध योगेश राठोड उर्फ नानावत आणि त्यांचे दोन साथीदार यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पोलीस उपायुक्त डाॅ. काकासाहेब डोळे यांनी याबाबत माहिती दिली. २४ डिसेंबरला पोपट चांदेरे (वय ४४, रा. सुसगाव) यांच्या घरात अज्ञातांनी चोरी करून ११९ तोळे दागिने आणि दोन लाख ९० हजारांची रोकड चोरून नेल्याचा प्रकार उघडकीस आला. हिंजवडी पोलिसांनी परिसरातील ५७ पेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले. त्यातील दोघेजण हिंजवडी फेज तीन येथे येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोघांना सापळा लावून ताब्यात घेतले. दोघांकडे चौकशी केली असता यांची टोळी असून त्यांनी यापूर्वी पुणे जिल्ह्यात ४८ ठिकाणी अशा प्रकारचे गुन्हे केल्याचे उघड झाले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, पोलीस निरीक्षक सुनील दहिफळे, सोन्याबापू देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक सागर काटे, राम गोमारे, उपनिरीक्षक अजित काकडे, पोलीस अंमलदार बंडू मारणे, बाळकृष्ण शिंदे, योगेश शिंदे, कुणाल शिंदे, बापूसाहेब धुमाळ, कैलास केंगले, विक्रम कुदळ, अरुण नरळे, रितेश कोळी, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, कारभारी पालवे, दत्ता शिंदे, अमर राणे, ओमप्रकाश कांबळे, सागर पंडीत, सुभाष गुरव, सोनाली ढोणे, श्रुती सोनावणे, शालिनी वचकल यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
दोन मिनिटांत केली घरफोडी
सराईत असलेले हे चोरटे सायंकाळी तसेच रात्रीही रेकी करत. त्यानंतर रात्री घरफोडी करीत असत. चांदेरे यांच्या घरावर आरोपींनी दोन दिवस पाळत ठेवली. २३ डिसेंबरला चांदेरे पाहुण्यांकडे गेले असता रात्री चोरट्यांनी घरफोडी केली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये हा प्रकार कैद झाला असून अवघ्या दोन मिनिटात ही चोरी केल्याचे उघड झाले.