पिंपरी : पार्टटाईम जॉबसाठी पैसे भरल्यास व्याज देण्याच्या आमिषाने तरुणाची दोन लाख ५५ हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना सहा ते सात सप्टेंबर या कालावधीत चिंचवडच्या चापेकर चौकात घडली. याप्रकरणी प्रशांत विलासराव टाले (वय ३०, रा. चिंचवड) यांनी शुक्रवारी (दि. ६) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी तरुणाशी संपर्क साधणाऱ्या तसेच ज्या बँक अकाऊंटवर पैसे पाठवले, त्या खातेधारकावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पार्टटाईम जॉब करण्यासाठी प्रशांत यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना १२ ते १५ टास्क पूर्ण करण्यास सांगितले. शिवाय प्री डिपॉझिट भरण्यास सांगून त्यावर चांगले व्याज व मूळ रक्कम परत देण्याचे आमिष दाखविण्यात आले. टास्कच्या विविध लिंक पाठवून त्यांचा विश्वास संपादन करून दोन लाख ५५ हजारांची फसवणूक करण्यात आली.