पिंपरी : तीन लाख रुपयांसाठी अपहरण करून तरुणास मारहाण करून सोडून देण्यात आले होते. चिंचवड येथे गुरुवारी (दि. १८) दुपारी साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला होता. या प्रकरणी अपहरण करणाऱ्या दोन गुन्हेगारांना शिताफीने अटक केली आहे. चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चंद्रकांत महादेव कांबळे (वय २७,रा. लिंक रोड), अभिजीत राजेंद्र इंगवले (वय २४, रा. बौध्दनगर, पिंपरी) अशी आरोपींची नावे आहेत. तर यशवंत ताडीवाल व एक अनोळखी चारचाकी मोटार चालक अद्याप फरार आहेत. ओंकार ज्ञानदेव वटाणे (वय २४, रा. चिंचवड) यांना काही एक कारण न सांगता ३ लाख रुपयांची मागणी करीत मारहाण करून गाडीत घालून अपहरण करून पळवून नेले होते. याबाबत वटाणे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आरोपी चंदूकांबळे व त्याचा साथीदार हॉटेल ईगल समोरील उड्डापुलाखाली येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार सापळा रचण्यात आला.
रात्री सव्वाआठच्या सुमारास दोन इसम उड्डापुलाखाली संशयीत दिसले. पोलिसांनी हटकताच दोघांनीही पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी दोघांनाही ताब्यात घेतले. चंद्रकांत कांबळे व अभिजीत इंगवले अशी त्यांची नावे असल्याचे त्यांनी चौकशीत सांगितले. यशवंत ताडीवाल व एक अनोळखी चारचाकी चालक यांच्यासह गुन्हा केल्याचे त्यांनी चौकशी दरम्यान सांगितले.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरिक्षक (गुन्हे) विश्वजीत खुळे, सहा यक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव, पोलीस उपनिरीक्षक गणेश अटवे, पोलीस हवालदार दत्ता गायकवाड, सुधाकर आवताडे, जयवंत राऊत, सचिन वर्णेकर, अमोल माने, रुपाली पुरीगोसावी यांनी ही कामगिरी केली.