पिंपरी : फ्लॅटसाठी दिलेल्या पैशांचा वापर बांधकामासाठी न करता बांधकाम केले नाही. फ्लॅटचे हस्तांतरण न करून २ कोटी २९ लाख ८४ हजार २०० रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. ११) दोघांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विश्वजित सुभाष झंवर आणि महेश बन्सीलाल लड्डा असे आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी रजजित हेमचंद्र ओक (वय ४६, रा. पाषाण रोड, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी विश्वजित झंवर आणि महेश लड्डा पुणे येथील मार्व्हल ओमेगा बिल्डर्सचे संचालक आहेत. पुण्यातील बावधन खुर्द येथे मार्व्हल सेल्व्हा रिज इस्टेट नावाचा प्रकल्प आहे. यातील एक फ्लॅट फिर्यादी रणजित ओक यांनी खरेदी केला आहे. त्यासाठी ३१ डिसेंबर २०१४ ते मंगळवार दि. ११ जून २०१९ कालावधीत त्यांनी २ कोटी २९ लाख ८४ हजार २०० रुपये आरोपी विश्वजित झंवर आणि महेश लड्डा यांना दिले. मात्र आरोपींनी फ्लॅटचे बांधकाम मुदतीत पूर्ण केले नाही. फिर्यादी ओक यांनी विश्वासाने दिलेले पैसे आरोपींनी बांधकामाऐवजी इतर कामासाठी वापरले असावेत. तसेच फ्लॅटचे हस्तांतरण न करता विश्वासघात करून फिर्यादी ओक यांची फसवणूक केली. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.