पिंपरी : दोन टोळक्यांमध्ये वाद झाला. यात दोन्ही टोळक्यांनी मारहाण तसेच शिवीगाळ करून राडा केला. काळेवाडी फाटा, थेरगाव येथे ते १९ ऑगस्ट रोजी ही घटना घडली. याप्रकरणी मंगळवारी (दि. २२) वाकडपोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिल्या प्रकरणात आदिल जुबेरअहमद अन्सारी (वय २४, रा. काळेवाडी फाटा, थेरगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार शकीर ताहेर सय्यद (३४, रा. साळुंब्रे, ता. मावळ), इमरान इब्राहिम शेख (३५, रा. पवनानगर, थेरगाव), हाजी मलंग दौलत शेख (२७, रा. घरकुल, चिखली) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्यांना अटक केली.
सर्व संशयित आदिल अन्सारीच्या दुकानात आले. ‘तुझा धंदा जोरात चाललाय, हा एरिया आमचा आहे. तुला येथे धंदा करायचा असल्यास आम्हाला २०० रुपये हप्ता द्यावा लागेल’, असे म्हणून धमकी दिली. आतापर्यंत हप्ता म्हणून ६०० रुपये खंडणी घेतलेली आहे. हप्ता दिला नाही म्हणून ते दुकानात घुसले. ‘तू पोलिसांना बोलाव किंवा कोणालाही बोलाव. सुटून आल्यावर तुला व तुझ्या भावांना दुकानासकट जाळून टाकू’, अशी धमकी संशयितांनी दिली. आदिल अन्सारी व त्याच्या भावाला हाताने, पायाने, चप्पलने मारहाण करून शिवीगाळ केली, असे फिर्यादीत नमूद आहे.
दुसऱ्या प्रकरणात इमरान इब्राहिम शेख याने फिर्याद दिली. त्यानुसार झहीद अन्सारी, फैज अन्सारी, शोएबन अन्सारी, आदिल अन्सारी, खुराशीद अन्सारी, अनिब शेख, प्रतीक व इतर दोन-तीन जण (सर्व रा. थेरगाव) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शेख यांच्यासह शाकीर ताहीर सय्यद (रा. साळुम्ब्रे, ता. मावळ), हाजीमलंग दौलत शेख (रा. चिखली) अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, इम्रान आणि त्यांचे दोन मित्र काळेवाडी फाटा येथून जात होते. त्यावेळी संशयित झहीदने त्यांना थांबवले. संशयितांनी शेख आणि त्याच्या दोन मित्रांना लाकडाने, कोयत्याने, गज, दगडाने आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर ते पळून गेले, असे फिर्यादीत नमूद आहे.