पिंपरी : राष्ट्रीय स्तरावरील हाॅकीपटूंमध्ये खेळादरम्यान वाद झाला. यातील एका हाॅकीपटूने त्याच्या मित्रांसह इतर दोन हाॅकीपटूंवर हल्ला केला. यात चाकूने वार करून एकाला जखमी केले. तर दुसऱ्याला मारहाण करून त्याचे दोन दात पाडले. याप्रकरणी नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. बालेवाडी हाॅस्टेलच्या गेटसमोर, म्हाळुंगे-बालेवाडी येथे मंगळवारी (दि. २२) रात्री पावणेआठच्या सुमारास ही घटना घडली.
रोहन राजेंद्र पाटील (वय २१, रा. क्रीडाप्रबोधिनी, म्हाळुंगे, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी याप्रकरणी बुधवारी (दि. २३) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी रोहन व त्यांचा मित्र हरिश शिंदगी हे दोघेही यात जखमी झाले. प्रतिक बिराजदार आणि त्याचे आठ मित्र यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी रोहन पाटील व त्यांचे मित्र हरिश शिंदगी तसेच प्रतिक बिराजदार हे तिघेही राष्ट्रीय स्तरावरील हाॅकीपटू आहेत. २१ मार्चला खेळा दरम्यान त्यांच्यात वाद झाला. त्याचा राग प्रतिक बिराजदार याच्या मनात होता. त्यानंतर फिर्यादी रोहन व त्यांचा मित्र हरिश शिंदगी हे दोघेही मंगळवारी (दि. २२) रात्री पावणे आठच्या सुमारास हाॅस्टेलच्या गेटसमोर गप्पा मारत होते. त्यावेळी प्रतिक बिराजदार त्याच्या आठ मित्रांसह तेथे आला. २१ मार्च रोजी झालेल्या वादाच्या रागातून प्रतिक आणि त्याच्या मित्रांनी फिर्यादी रोहन यांच्या डाव्या हातावर चाकूने वार करून जखमी केले. तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. फिर्यादी रोहन यांचा मित्र हरिश शिंदगी यालाही लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचे दोन दात पाडून गंभीर जखमी केले, असे फिर्यादित नमूद आहे.