पिंपरी : शहरामध्ये विविध ठिकाणी चार अपघात झाले. यामध्ये दोघांजणाचा मृत्यू झाला, तर दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. चिंचवड येथे डंपरने ज्येष्ठ नागरिकांला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरूवारी (दि. ७) सकाळी दहा वाजता बिजलीनगर येथील श्रीपाद गुड इंग्रजी माध्यमिक शाळेसमोर घडली. बजरंग जोरकर (वय ६५) असे मृत्यू झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी अर्चना विकास पवार (वय ३०) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार डंपर चालक गणेश अत्तम (पूर्ण नाव पत्ता माहित नाही) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील बजरंग जोरकर हे रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी भरधाव वेगात आलेल्या डंपरने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. याबाबत गुन्हा दाखल झाला असून चिंचवड पोलीस तपास करीत आहेत. दुसºया घटनेमध्ये दुचाकीची रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबास जोरदार धडक बसून दुचाकीचालकाचा मृत्यू झाला. ही घटना ९ फेब्रुवारी २०१९ रोजी घडली. सचिन बबरूवान सुडे (वय २८, रा. लातूर) असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीसनाईक संतोष हरिभाऊ रासकर (वय ४३) यांनी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सचिन हा त्याच्या दुचाकीवरून (एमएच २४ एएल ४३१९) पुणे मुंबई रस्त्यावरून भरधाव वेगाने जात होता. त्यावेळी त्याचे दुचाकीवरील नियंत्रण सुटून दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या खांबावर जाऊन आदळली. यामध्ये सचिन याच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. भोसरी पोलील तपास करीत आहेत. रस्त्याने जात असलेल्या नागरिकाला टेम्पोने जोरदार धडक दिली. यामध्ये नागरिकाच्या खांद्याला व छातीला गंभीर दुखापत झाली. ही घटना मंगळवारी (दि. ५) सकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास मार्शल कंपनीसमोर कासारवाडी येथे घडली. मोहनीश विश्वनाथ भाटीया असे जखमी झालेल्या नागरिकाचे नाव आहे. याप्रकरणी अनुराधा विश्वनाथ भाटीया (वय ५८, रा.रावेत) यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अनंत गोपीनाथ म्हस्के (वय २३, रा. शिवसाई कॉलनी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे भाऊ मोहनीश हे पुणे मुंबई रस्त्यावरुन जात होते. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या टेम्पोने (एमएच १४ डीएम ३८३३) त्यांना पाठीमागून धडक दिली. यामध्ये त्यांच्या खांद्याला, छातीला व फुफ्फुसाला गंभीर दुखापत झाली.
अॅटो रिक्षाने जात असताना मोटारीने धडक दिल्याने एक महिला गंभीर जखमी झाली. ही घटना २३ आॅगस्ट रोजी सात वाजता चिंचवड एमआयडीसी येथे घडली. याप्रकरणी रोझाना डडेसाईन रॉड्रेक्स (वय ६५, रा. चिंचवड) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार एमएच १४ एचएम ९०९९ या मोटारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अॅटो रिक्षामधून आपल्या घरी जात होत्या. त्यावेळी भरधाव वेगाने आलेल्या मोटारीने त्यांच्या रिक्षाला जोरदार धडक दिली. यामध्ये फिर्यादी यांच्या कपाळाला दुखापत झाली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.