पिंपरी : उद्योगनगरीत झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांमध्ये एका पादचाऱ्याचा व एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. चऱ्होली, सांगवी फाटा, देहूगाव फाटा व वाकड येथे हे अपघात झाले. याप्रकरणी दिघी, सांगवी, देहूरोड व हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
अपघाताचा पहिला प्रकार चऱ्होली येथे पुणे-आळंदी रस्त्यावरील एका पेट्रोल पंपासमोर ११ डिसेंबर २०१९ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी गोरख पुंडलीक आहेर (वय ३०, रा. आळंदी) यांनी याप्रकरणी दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दिगंबर मुंडे (रा. आळंदी) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी त्यांचे चारचाकी वाहन डिझेल भरण्यासाठी पेट्रोल पंपावर घेऊन जात असताना पैसे नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे घरून पैसे आणण्यासाठी ते घराकडे निघाले. त्यावेळी त्यांच्या युटर्न घेत असताना आरोपी मुंडे याच्या भरधाव तीनचाकी टेम्पोने त्यांच्या चारचाकीच्या मागच्या बाजूच्या बोनटला धडक दिली. त्यानंतर चारचाकीच्या दोन्ही दरवाजांना घासून नुकसान केले. दिघी पोलीस तपास करीत आहेत.अपघाताचा दुसरा प्रकार पुणे-मुंबई महामार्गावर देहूगाव फाटा येथे शुक्रवारी (दि. ७) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. याप्रकरणी नीलेश गजानन राजवाडे (वय ३९, रा. वारजे, पुणे) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार चारचाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी याने त्याच्याकडील चारचाकी वाहन भरधाव चालवून फिर्यादी यांच्या वाहनाला धडक दिली. यात त्यांच्या वाहनाचे नुकसान झाले. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.
अपघाताचा तिसरा प्रकार मुंबई-बेंगळुरू महामार्गावर वाकड येथे शुक्रवारी (दि. ७) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडला. लक्ष्मण गोपाळराव महाजन (वय ६५) असे मृत्यू झालेल्या पादचा-याचे नाव आहे. याप्रकरणी भूषण लक्ष्मण महाजन (वय १८, रा. डांगे चौक, थेरगाव) यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लालासो मारुती शेवाळे (वय ५२, रा. कोळेवाडी, ता. कराड, जि. सातारा) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भूषण यांचे वडील लक्ष्मण महाजन हे रस्ता ओलांडत असताना आरोपी याने त्याच्याकडील टेम्पो भरधाव चालवून त्यांना धडक दिली. यात गंभीर जखमी झाल्याने लक्ष्मण महाजन यांचा मृत्यू झाला. हिंजवडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नामदेव आंगज तपास करीत आहेत.
अपघाताचा चौथा प्रकार सांगवी फाटा येथे शुक्रवारी (दि. ७) दुपारी साडेचारच्या सुमारास घडला. आकाश अरुण पाटील (वय २२, रा. भुजबळ चौक, वाकड, मुळगाव उर्वशी नगर, कठोरा रोड, अमरावती) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी अजय अरुण फल्ले (वय ३१) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार लक्झरी बसच्या अज्ञात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिंसानी दिलेल्या माहितीनुसार, आकाश पाटील हे दुचाकीवरून औंधकडून पिंपळे निलख येथील रक्षक सोसायटीच्या दिशेने जात होते. त्यावेळी सांगवी फाटा येथे पुलाच्या पुढे आरोपी चालकाने लक्झरी बस भरधाव चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यामुळे दुचाकीसह आकाश पाटील रस्त्यावर पडले. त्यावेळी लक्झरी बसच्या चाकामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यात त्यांचा मृत्यू झाला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.