पिंपरी - विद्युत डीपीचा स्फोट होऊन त्यातील ऑईल अंगावर उडाल्यामुळे पाच महिन्यांच्या चिमुकलीसह तिची आई व आजी यात गंभीर जखमी झाल्या होत्या. तर याच स्फोटात आग लागून दुचाकी जळून खाक झाली होती. मात्र, या घटनेतील गंभीर जखमी झालेल्या आजी आणि ५ महिन्यांच्या चिमुरडीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे शनिवारी (दि. ५) दुपारी घडली.
शारदा दिलीप कोतवाल (वय ५०), शिवन्या सचिन काकडे (वय ५ महिने) असे या घटनेत मृत्यू झालेल्यांची नवे आहेत.याच अपघातात ५ महिन्यांच्या बाळाची आई असलेल्या अक्षदा सचिन काकडे (वय ३२) या गंभीर जखमी झाल्या आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इंद्रायणी नगर येथे शनिवारी डिपीचा स्फोट झाला. डीपीला लागून असलेल्या घरात डीपीतील ऑईल उडाले. त्यावेळी अक्षदा त्यांची मुलगी शिवन्या हिला आंघोळ घालत होत्या. त्यांची आई शारदा देखील तेथेच होत्या. शारदा, अक्षदा व चिमुकल्या शिवन्या यांच्या अंगावर डीपीतील हे ऑईल उडून त्या तिघींना भाजले. यात त्या गंभीर जखमी झाल्या. तसेच स्फोटामुळे येथे आग लागली. काही नागरिकांनी अग्निशाम दलाला याबाबत माहिती दिली.
अग्निशमन दलाचे जवान तेथे तत्काळ दाखल झाले. अग्निशामक दलाचे अशोक कदम, विकास नाईक आणि पुंडलिक भुतापल्ले यांनी आगीवर नियंत्रण मिळविले. दरम्यान भाजल्याने तिघींना भोसरी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्यांना पुण्यातील ससून रुग्णालयात हलविण्यात आले. त्यांच्या घरातील सुमारे एक लाखाच्या घरगुती साहित्याचे नुकसान झाले. तसेच त्यांची दुचाकी यात जळून खाक झाली आहे.