पिंपरी : शेती उपयोगी ट्रॅक्टर, यंत्रासाठी सरकारकडून अनुदान मिळवून देतो, असे सांगून तहसीलदाराचे नाव सही व शिक्का असलेली खोटी कागदपत्रे दाखविली. तसेच दोन लाख ८६ हजार रुपये बँक खात्यामध्ये भरण्यास सांगून दोन शेतकऱ्यांची फसवणूक केली. भोसरी येथे नोव्हेंबर २०२० ते ३ सप्टेंबर २०२१ या कालावधीत हा प्रकार घडला.
रमेश नथु फुगे (वय ६२, रा. भोसरी) यांनी या प्रकरणी सोमवारी (दि. २७) दिघी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. प्रवीण बबन जाधव (वय ३५, रा. नारायणगाव, ता. जुन्नर), असे आरोपीचे नाव आहे. फिर्यादी फुगे तसेच या प्रकरणातील साक्षीदार संतोष पोपट गवारी हे शेतकरी आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विघ्नहर फार्मर्स प्रोड्युसर, या नावाची आपली संस्था असून संस्थेचे मुख्य कार्यालय नारायणगाव, ता. जुन्नर येथे आहे, असे आरोपीने फिर्यादी व साक्षीदार संतोष गवारी यांना सांगितले. राष्ट्रीय कृषी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मालवाहतूक गाडी व शेती उपयोगी ट्रॅक्टर, इतर यंत्रासाठी सरकारकडून अनुदान मिळवून देतो, असे आरोपीने फिर्यादीला सांगितले. तसेच तहसीलदार, जुन्नर यांचे नाव, सही व शिक्का असलेली खोटी बनवलेली सरकारी कागदपत्रे दाखवून व त्या कागदपत्रांची छायांकित प्रत देऊन आरोपीने फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन केला.
फिर्यादीला एक लाख ५० हजार ५०० रुपये तसेच संतोष गवारी यांना एक लाख ३५ हजार ५०० रुपये आरोपी याच्या विघ्नहर फार्मर्स प्रोड्युसर या संस्थेच्या पवना सहकारी बँक, दापोडी शाखा येथील खात्यामध्ये भरण्यास सांगून आरोपीने फिर्यादीची व साक्षीदार संतोष गवारी यांची फसवणूक केली. पोलीस उपनिरीक्षक आर. बी. भंडारे तपास करीत आहेत.