आळंदी : इंद्रायणी नदीत गणपती विसर्जनाच्या वेळी दोन तरुण गणेशभक्तांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. त्यापैकी एकाचा मृतदेह अग्निशमन दलाच्या जवानांनी शोधला आहे. तर बुडालेल्या अन्य एकाला शोधण्याचे काम सुरू आहे. प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८) व दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) अशी या दुर्घटनेत नदीपात्रात बुडालेल्या तरुणांची नावे आहेत. त्यापैकी प्रज्वल काळे याचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत आळंदी रस्त्यावरील हवालदार वस्तीजवळ रविवारी (दि.१९) सायंकाळी सहाच्या सुमारास ही दुर्घटना घडली. आळंदीलगत डुडुळगावच्या माऊली वस्ती येथील ठोंंबरे कुटुंबीय इंद्रायणीकडे गणेश विसर्जनासाठी आले होते. त्यांच्या पैकी शिवाजी अर्जुन ठोंबरे (वय ३०) नितीन अर्जुन ठोंंबरे (वय ३९), दत्ता आबासाहेब ठोंंबरे (वय २०) आणि प्रज्वल रघुनाथ काळे (वय १८) हे चौघे पाण्यात मूर्ती विसर्जनसाठी उतरले. नदी पात्रात मध्यभागी गेले असताना पाण्याचा अंदाज न आल्याने दत्ता ठोंबरे व प्रज्वल काळे हे पाण्यात बुडाले. बुडालेल्या दोघांनाही पोहता येत नव्हते. घटनास्थळी भोसरी एमआयडीसी पोलीस, आळंदी पोलीस आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने शोध मोहिम हाती घेतली. त्यात प्रज्वल काळे याचा मृतदेह पाण्यात आढळून आला असून दत्ता ठोंबरेचा शोध सुरू आहे.
गणेश विसर्जनवेळी इंद्रायणीत बुडून दोघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2021 11:25 PM