पिंपरी : अध्यक्षपद निवडीत डावलल्याने पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीतील दोन सदस्यांनी राजीनामा दिला होता. त्या दोन रिक्त पदांसाठी शुक्रवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवड होणार आहे. दोन पदांसाठी भाजपातील नरगसेवकांमध्ये चुरस लागली आहे. त्यावर कोणाची वर्णी लागते याबाबत उत्सुकता आहे. महापालिकेच्या २० एप्रिलच्या सभेत नवीन सदस्य निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे.महापालिका स्थायी समितीमध्ये सोळा सदस्य असून, भाजपाचे दहा, राष्ट्रवादी काँग्रेसचे चार, शिवसेनेचा एक तर अपक्ष एक असे पक्षीय बलाबल आहे. महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी डावलल्याने आमदार महेश लांडगे समर्थक महापौर नितीन काळजे, सदस्य राहुल जाधव, क्रीडा समितीचे सभापती आणि नगरसेवक शीतल शिंदे यांनी राजीनामा दिला होता. त्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समजूत काढली होती. त्यामुळे दोघांचे राजीनामे स्वीकारले नव्हते. मागील आठवड्यात शिंदे आणि जाधव यांचे राजीनामे स्वीकारले आहेत. त्यामुळे या दोन जागा रिक्त झाल्या होत्या. आता त्यांच्या जागी नवीन सदस्यांची निवड सर्वसाधारण सभेत केली जाणार आहे़ सदस्य निवडीचा विषयपत्रिकेवर पहिलाच विषय आहे.शह काटशहस्थायी समितीच्या अध्यक्षपदावर आमदार महेश लांडगे समर्थक जाधव, निष्ठावान नगरसेवक विलास मडिगेरी व शीतल शिंदे यांच्या नावाची चर्चा होती. तिघांपैकी एकाची वर्णी लागणार हे निश्चित झाले होते. मात्र भाजपाचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक ममता गायकवाड यांची सभापतिपदी निवड झाली. त्यामुळे जाधव, शिंदे यांनी राजीनामे दिले होते. मात्र, स्वीकारले नव्हते. शिंदे आणि जाधव हे प्रबळ दावेदार असल्याने राजीनामा देण्यावर ठाम राहिले. त्यामुळे दोघांचे राजीनामे महापौर नितीन काळजे यांनी मंजूर केले.
दोन जागांसाठी ‘स्थायी’त चुरस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 3:13 AM