पिंपरी :पोलिसांनी पायी गस्त तसेच रात्र गस्तीवर भर दिल्याने पिंपरी-चिंचवडपोलिस आयुक्तालयांतर्गत चोरीच्या प्रकारांमध्ये घट झाली. चोरीप्रकरणी जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत २०२२ मध्ये २५२२ तर यंदा ११ महिन्यांमध्ये २१२४ गुन्हे दाखल झाले, तसेच चोरीचे गुन्हे उघड होण्याचे प्रमाणदेखील यंदा जास्त आहे.
७३५ गुन्हे उघडकीस
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयांतर्गत चोरीचे गुन्हे यंदा घटले. गेल्या वर्षी जानेवारी ते नोव्हेंबर या कालावधीत चोरीचे ६४५ गुन्हे उघड झाले. चोरीच्या एकूण दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत हे २६ टक्के प्रमाण होते, तर यंदा ७३५ गुन्हे उघड झाले. दाखल गुन्ह्यांच्या तुलनेत ३४ टक्के प्रमाण आहे.
चोरट्यांना रंगेहाथ पकडले
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी यंदा ११ महिन्यांत चोरीच्या गुन्ह्यातील ९०५ संशयितांना अटक केली. यात काही चोरट्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
एमआयडीसीत सर्वाधिक चोऱ्या
पोलिस आयुक्तालयांतर्गत एमआयडीसीचा मोठा परिसरत आहे. एमआयडीसीतील कंपन्यांमधील साहित्य चोरीला जाण्याचे प्रकार जास्त घडतात, तसेच उघड्या दरवाजावाटे मोबाइल, लॅपटाॅप चोरीचे प्रकारही जास्त आहेत. यासोबत मोबाइल हिसकावण्याचे प्रमाण वाढले आहे.
पोलिसांपुढे अडचणींचा डोंगर
गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. पुरेसे सीसीटीव्ही कॅमेरे नसल्याने गुन्ह्यातील संशयितांचा माग काढणे, ओळख पटवणे सहज शक्य होत नाही. तसेच सततचा बंदोबस्त, व्हीआयपींचे दौरे यामुळे तपासात सातत्य राहत नाही. गुन्ह्यांच्या तुलनेत अपुरे मनुष्यबळ आहे. त्यामुळे एकाच वेळी अनेक गुन्ह्यांचा तपास करावा लागतो.
गंभीर गुन्ह्यांसह चोरीच्या गुन्ह्यांच्या तपासावर भर दिला आहे. तसेच चोरट्यांची माहिती काढून त्यांच्यावर ‘वाॅच’ ठेवून कायदेशीर कारवाई केली. एमआयडीसीत तसेच शहरांतर्गत पायी गस्तीसह रात्रगस्तीवर भर दिला. परिणामी, चोरीचे प्रकार कमी झाले.
- वसंत परदेशी, अपर पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड