काळेवाडी : पुणे ते लोणावळा दरम्यान आणखी दोन रेल्वे ट्रॅक उभारण्यात येणार आहेत. तिसरी आणि चौथी उपनगरीय रेल्वेलाइन सुरू केली जाणार असून, त्यासाठी दोन हजार ३०६ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील प्रवाशांसाठी पाच ठिकाणी रेल्वे थांबा घेणार असल्याने ट्रॅकसाठी येणाऱ्या खर्चापैकी २७५ कोटी रुपयांचा हिस्सा पिंपरी महापालिका देणार आहे.पुणे ते लोणावळादरम्यान तिसरी आणि चौथी उपनगरीय रेल्वेलाइन सुरु करण्यास मध्य रेल्वेने मान्यता दिली आहे. याबाबत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने १२ जानेवारी २०१६ च्या पत्रान्वये महाराष्ट्र शासनाला कळविले आहे. या प्रकल्पासाठी जमीन संपादनाव्यतिरिक्त दोन हजार ३०६ कोटी रुपये इतका खर्च आहे. यामध्ये रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र शासन यांचा समान हिस्सा असेल. पुणे-लोणावळा रेल्वेलाईन प्रकल्पासाठीची ५० टक्के रक्कम पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे देण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. त्याप्रमाणे दोन्ही महापालिका आणि प्राधिकरण यांनी आपापल्या हद्दीतील लांबीप्रमाणे देय असलेली पन्नास टक्के रक्कम देण्याबाबत कळविले आहे. पालिका हद्दीतील रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या खर्चाची रक्कम देण्यासाठी पिंपरी महापालिका तयार असल्याचे मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनला कळविले आहे. महापालिका हद्दीतील ट्रॅकसाठी येणाऱ्या एकूण साडेपाचशे कोटी रुपयांपैकी पन्नास टक्के रक्कम पिंपरी महापालिका राज्य शासनाला देणार आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाव्यतिरिक्त ही रक्कम देण्यात येणार असून, याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी महापालिकेच्या स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला आहे. (वार्ताहर)- या रेल्वे ट्रॅकसाठी येणाऱ्या एकूण दोन हजार ३०६ कोटी रुपये खर्चापैकी पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील रेल्वे ट्रॅकचा खर्च सुमारे साडेपाचशे कोटी रुपये इतका आहे. या रेल्वेलाइनचा लाभ पिंपरी-चिंचवड शहरातील प्रवाशांना होणार आहे.
पुणे-लोणावळा लोहमार्गावर दोन ट्रॅक
By admin | Published: June 12, 2016 5:53 AM