देहूगाव : येथील देहू-आळंदी रस्त्यावर विठ्ठलनगर येथील जिल्हा परिषद शाळेसमोर मोठ्या प्रमाणात सांडपाणी आल्याने अनेक दुचाकीस्वार घसरुन पडले. सुमारे तासभर घसरगुंडीनाट्य सुरु होते. विठ्ठलनगर ते देहू दरम्यान या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले आहे. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका व ग्रामपंचायत प्रशासन एखाद्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूची वाट पाहत आहे काय असा संतप्त सवाल येथील ग्रामस्थ विचारत आहे. देहू -आळंदी रस्ता महापालिकेच्या वतीने विकसित करण्यात येणार आहे. सध्या या रस्त्याची खड्डयांमुळे चाळण झाली आहे. रस्त्याच्या उत्तरेकडील बाजूचे रुंदीकरण करण्यासाठी बांधकामे तोडली आहेत. ही बांधकामे तोडल्यानंतर त्यांचा राडारोडा हा रस्त्याच्या कडेला पडल्याने गटारे बुजली आहेत. ठिकठिकाणी रस्ता ओलांडण्यासाठी गटारे बुजविली आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सांडपाणी थेट रस्त्यावर येत आहे. या बाबत ग्रामस्थांनीही बऱ्याच वेळा तक्रारी केल्या. मात्र, हा रस्ता महापालिका करणार आहे. त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे असे ग्रामपंचायतीकडून सांगितले जाते. बुधवारी सकाळी रस्त्यावर मोठ्या प्रमाणात गटाराचे पाणी आले. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचले. त्यामुळे खड्डे मोठे असूनही दुचाकीस्वार व इतर वाहनाचालकांना दिसत नव्हते. याच रस्त्याने सुदुंबरे येथे महाविद्यालयात विद्यार्थी जातात. तळेगाव,चाकण औद्यागिक पट्ट्यातील कामगारही याच मार्गाने जातात. सकाळी सांडपाणी रस्तावर सांडपाणी आल्याने हा रस्ता निसरडा झाला. वेगाने येणाऱ्या दुचाकी एकामागोमाग एक घसरू लागल्या. घटनास्थळाजवळच असलेला दवाखाना सुरु नसल्याने पडलेल्या दुचाकीस्वारांना तातडीने रुग्णालयात पाठविण्यात येत होते. पडलेल्या दुचाकीस्वारांनी सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत नाही. मात्र, रस्त्याचे हस्तांतरण काम करून घेण्याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाचे मानापमान, बाधितांना नुकसान भरपाई देण्याचा प्रलंबीत प्रश्न, याकडे प्रशासनाकडून केला जाणारा विलंब यामध्ये या रस्त्याने प्रवास करणारा प्रवाशी व वाहन चालक भरडले जात आहेत. ग्रामपंचायती, महानगरपालिका किंवा जिल्हा प्रशासन व महसुल विभाग हे प्रवाशाचे प्राण जाण्याची वात पाहणार आहेत असा जळजळीत प्रश्न नागरिक विचारत आहेत. या घटने नंतर ठिकठिकाणच्या खड्ड््यांमध्ये मुरुम टाकण्यात आला आहे. मात्र त्यामुळे आणखी पाणी रस्त्यावर आल्यास मोठ्या प्रमाणात घसरगुंडी तयार होण्याती शक्यता आहे.(वार्ताहर)तीन वर्षांत अनेक अपघातया पुर्वीही दोनवेळा या रस्त्यावर पाणी आल्याने घसरगुंडी झाली होती. त्याही वेळी ५० ते ६० दुचाकीस्वार घसरुन पडले होते. त्यापुर्वी खड्ड्यामुळे अपघात होऊन तीन जणांना आपले प्राण गमवावे लागले होते. गेल्या दोन तीन वर्षीत अनेक लहान मोठे अपघात होऊन काही दुचाकीस्वारांना व ग्रामस्थांना आपले प्राण गमवावे लागले होते. या रस्त्याचे तातडीने रुंदीकरण करावे यासाठी येथील ग्रामस्थांनी सर्वपक्षीय रास्तारोको आंदोलन केले होते. त्यांनी या रस्त्याचा प्रश्न एक महिन्यात निकाली काढून कामाला सुरवात करू असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महसूल विभागाच्या कडून देण्यात आले होते. त्यामुळे हे आंदोलन स्थगित करण्यात आले होते. या घटनेला महिना उलटला तरी प्रशासनाला अद्याप जाग आलेली नाही.
देहू-आळंदी रस्त्यावर दुचाकीस्वारांची घसरगुंडी
By admin | Published: February 23, 2017 2:52 AM