नारायण बडगुजर
पिंपरी : तंबाखू सेवनविरोधी जनजागृतीसाठीची मोहीम केवळ कागदोपत्री राबविण्यात येत आहे. पिंपरी - चिंचवड महापालिकेच्या पिंपरीगावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयात शनिवारी (दि. २२) सकाळी मौखिक आरोग्याबाबत जनजागृतीसाठी सभेचे आयोजन केले होते. मात्र सभेबाबत माहिती नसल्याने नागरिक फिरकले नाहीत. असे असतानाही सभा झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यासाठी एका कोऱ्या कागदावर रुग्ण व नातेवाईकांच्या सह्या घेण्यात येत होत्या. ' लोकमत' ने शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब समोर आली.
तंबाखूविरोधी सेवन पंधरवडा अंतर्गत महापालिका रुग्णालय, बाह्य रुग्णालय, दवाखाने तसेच गटस्तरावर सभा घेण्याचे महापालिकेने नियोजन केले आहे. असे असतानाही बहुतांश रुग्णालयांमध्ये अशा सभा घेण्यात आल्या नाहीत. त्याबाबत लोकमत प्रतिनिधीने पिंपरीगावातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर बाह्य रुग्णालयास शनिवारी सकाळी साडेदहाला भेट दिली. त्यावेळी रुग्णालयात केवळ चार रुग्ण होते. औषध विक्रीच्या खिडकीजवळ महिला कर्मचारी दोन कोरे कागद घेऊन रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची नावे लिहून घेत होती. केसपेपर घेऊन लोकमत प्रतिनिधी तपासणीसाठी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या कक्षात गेला. त्यानंतर औषध विक्रीच्या खिडकीजवळ आल्यानंतर संबंधित महिला कर्मचाऱ्याने प्रतिनिधीलाही नाव विचारून लिहून घेत कोऱ्या कागदावर सही करण्यास सांगितले. सह्या नेमक्या कशासाठी घेण्यात येत आहेत, असा प्रश्न उपस्थित केल्याने संबंधित कर्मचा-यांची भंबेरी उडाली. वरिष्ठांच्या आदेशानुसार सही घेत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. संबंधित कर्मचाऱ्यांकडे महापालिकेचा शिक्का असलेली नोंदवही नव्हती. तसेच सही घेण्यात येणाऱ्या कागदावरही तसा शिक्का किंवा सविस्तर माहिती नमूद केलेली नव्हती. मौखिक आरोग्याबाबत जनजागृती करण्यात येत असून, कोणाला तोंडात जखम असल्यास संबंधिताची मौखिक तपासणी करण्यात येते. नागरिकांना मौखिक आरोग्य जपण्याबाबतचे शिक्षणही या माध्यमातून देण्यात येते, असे संबंधित कर्मचाऱ्यांनी सांगितले. मात्र अशी कोणतीही माहिती न देता केवळ सही का करून घेतली जात आहे, असा प्रश्न केल्यानंतर संबंधित कर्मचारी गोंधळले. साहेब, सर्वेसाठी बाहेर गेले आहेत. बाकीचे कर्मचारीही कामात आहेत. त्यामुळे नागरिकांची नावे लिहून सही घेत असल्याचे संबंधित कर्मचा-यांनी सांगितले.
तंबाखू सेवनविरोधी दिनानिमित्त मोहीम राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शनिवारी सकाळी बाह्य रुग्णालयात सभा घेण्यात आली. त्यानंतर नागरिकांच्या सह्या घेण्यात येत होत्या. तंबाखू व गुटखा खाण्याने होणाऱ्या दुष्परिणामांबाबत या वेळी नागरिकांना माहिती देण्यात येत होती. डॉ. रुतुजा लोखंडे, वैद्यकीय अधिकारी, बाह्यरुग्णालय, पिंपरीगाव
प्रत्येक उपक्रमाची माहिती पत्रके, फलक प्रत्येकवेळी उपलब्ध होतीलच असे नाही. एकाचवेळी अनेक मोहिमा सुरू असतात. नियमित कार्यक्रमाचा भाग म्हणून त्या राबविल्या जातात. कर्मचाऱ्यांना त्यांचे काम करावेच लागते. डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका