मुंबई - महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार कोण? असा प्रश्न राज्याच्या राजकीय वर्तुळाच जोर धरत आहे. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात येत आहे. तर, मी शिवसेनेचाही मुख्यमंत्री असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना म्हटले. मात्र, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंना मुख्यमंत्रीपदाची दावेदार सांगण्यात येत आहे. नुकतेच मंत्रीपदाची शपथ घेतलेले जलसंपदामंत्री तानाजी सावंत यांनी भाजपाला टोला लागवला आहे.
शिवसेना पक्षप्रमुखांना 2014 साली चक्रव्यूहात अडकवल होतं, सत्तेचा माज मस्ती उतरविण्याची ताकद शिवबंधनात आहे. उस्मानाबादचे 6 ही आमदार आमचेच असतील. मित्र पक्षाने आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडू नये. युती असेल तर सोबत, नसेल तर आम्हीही एकला चलो रे, आमचंही ठरलंय, असे म्हणत तानाजी सावंत यांनी भाजपला सुनावले. तसेच उद्धव ठाकरेंना केवळ मुख्यमंत्रीच नाही, तर पंतप्रधान झालेलं पाहायला आवडेल, असेही सावंत यांनी म्हटले. पिंपरी चिंचवड येथे भूम-परंडा-वाशी रहिवाशी पुणे मंडळाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
याच कार्यक्रमात बोलताना सावंत यांनी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही टीका केली. मराठवाड्याच पळवलेलं पाणी 2024 पर्यंत परत आणणार, जाणता राजाने ही धमकी समजायची असेल तर समजावी. पुढची 5 वर्ष हाच एककलमी कार्यक्रम असेल, असा टोलाही शरद पवारांना सावंत यांनी लगावला. दरम्यान, राज्यातील बहुतेक धरणाचे ऑडीट झालंय, तिवरे धरण फुटल्यापासून आम्ही सावधानता बाळगत आहोतस, असेही सावंत म्हणाले.