पिंपरी : खरी शिवसेना एकनाथ शिंदे यांचीच आहे. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी केली. गद्दार कोण आणि खरे कोण हे सिद्ध झाले आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केली. महायुतीतील शिवसेनेच्या शिंदे गटाचे मावळ लोकसभा मतदारसंघातील उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारार्थ पिंपरी-चिंचवडमध्ये मेळावा झाला. त्यावेळी ते बोलत होते. माजी मंत्री विजय शिवतारे, बाळा भेगडे, खासदार बारणे, अमर साबळे, आमदार अश्विनी जगताप, उमा खापरे, अण्णा बनसोडे, भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप, राष्ट्रवादीचे सुनील गव्हाणे, शिवसेनेचे बाळासाहेब वाल्हेकर, मनसेचे सचिन चिखले आदी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले की, महायुतीच्या रेल्वेला नरेंद्र मोदी नावाचे इंजिन आहे. त्यामुळे त्यामागे कितीही बोगी जोडल्या जाऊ शकतात. इंडिया आघाडीतील सगळेच स्वत: इंजिन असल्याचे सांगतात. प्रत्येकजण बोगी स्वत:कडे ओढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्यांचं इंजिन हलतही नाही आणि डुलतही नाही. इंडिया आघाडीच्या इंजिनला डबेच नाहीत. त्यामुळे त्यांच्या इंजिनमध्ये फक्त घरातलीच माणसे बसू शकतात. राहुल गांधी यांच्या इंजिनमध्ये प्रियंका गांधी, उद्धव ठाकरे यांच्या इंजिनमध्ये आदित्य ठाकरे, शरद पवारांच्या इंजिनमध्ये सुप्रिया सुळे बसतील. त्यामुळे त्यांच्याकडे सामान्य माणसाला जागा नाही.
गद्दारी, बोके, खोकेच्या पुढे जात नाहीत...
फडणवीस म्हणाले की, इंडिया आघाडी म्हणजे २४ पक्षांची खिचडी झाली आहे. भारतात मोदींमुळे लस आली. जगातील बडेबडे नेते मोदी यांच्या पाठीशी आहेत. पिंपरी-चिंचवडमध्ये राज्यासह देशाच्या सर्व भागांतून रहिवासी आले आहेत. येथील श्रमिकांना त्यांचे अधिकार देण्याचा कायदा मोदींनी आणला. मात्र, आपल्याकडील नेते गद्दार-खोके-बोके यांच्या पलीकडे जात नाहीत, असाही टोला फडणवीस यांनी लगावला.