लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : कंपनीतून घरी जात असताना उर्से खिंडीत गाठून कॅडबरी कंपनीचे कामगार हिरामण मारुती भिलारे (वय ५१, रा. उर्से ) यांच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला करून आरोपींनी त्यांचा खून केला. प्रथमदर्शनी अपघात वाटल्याने शनिवारी याप्रकरणी वडगाव मावळ पोलिसांकडे अपघाताची नोंद करण्यात आली होती़ मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालामुळे अपघात नसून खून असल्याचे स्पष्ट झाले. कुटुंबीयांच्या तक्रारीवरून ३ जुलैला पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, मदन वारिंगे, गणेश दिनकर हिंगे या आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.सहायक निरीक्षक गणेश लोकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरामण भिलारे यांनी त्यांच्या जमिनीतून जाण्यासाठी रस्ता दिला नसल्याच्या रागातून आरोपी मदन वारिंगे, गणेश दिनकर हिंगे, इतर साथीदारांनी भिलारे यांच्यावर उर्से खिंडीत हल्ला केला. खिंडीत गाठून धारदार हत्याराने डोक्यात, हातावर वार केले. त्यांचा निर्घृण खून करून आरोपी तेथून पसार झाले होते. घटनास्थळी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे मनोज गुरव, वडगाव पोलीस ठाण्याचे अनिल मोरे यांनी पाहणी केली. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक सुवेझ हक, अप्पर पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते, लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी ज्ञानेश्वर शिवथरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रदीप काळे, सहायक निरीक्षक गणेश लोकरे यांच्या पथकाने तपास केला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण कानडे यांनी दिलेल्या शवविच्छेदन अहवालावरून हा अपघात नसून खून असल्याचे निष्पन्न झाले.या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक प्रदीप काळे करत आहे. नातेवाइकांचा अर्ज : घातपाताची शंका वडगाव मावळ पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाल्याची त्यांनी नोंद केली होती. मात्र, त्यांच्या नातेवाइकांनी लेखी अर्ज देऊन घातपात झाल्याची शंका व्यक्त केली होती. मयत हिरामण भिलारे यांचा मुलगा संतोष भिलारे यांनी जमिनीच्या वादातून खून झाल्याची तक्रार वडगाव पोलीस ठाण्यात दिली. यावरून आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल केला. या खुनाच्या घटनेत मदन वारिंगे, गणेश दिनकर हिंगे यांना अटक केली आहे.
उर्सेमधील खूनप्रकरणाचा अखेर उलगडा
By admin | Published: July 05, 2017 3:08 AM