पिंपरी : अधिकाऱ्यांचा वचक कमी झाल्याने लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या थेरगाव, काळेवाडी, चिंचवड, वाल्हेकरवाडी, रावेत, चिंचवडेनगर, इंद्रायणीनगर परिसरात जोरदार अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. अधिकारी आणि स्थानिक नगसेवकांच्या आशीर्वादाने ही बांधकामे राजरोसपणे सुरू आहेत. मात्र, प्राधिकरणाचा अतिक्रमण विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात सध्या विधान परिषद आणि नगरपालिका निवडणुकीची आचारसंहिता जारी केली आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रासह प्राधिकरण आणि म्हाडा, नदीपात्र रेड झोनमध्ये अनधिकृत बांधकामांना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीत मतांचे राजकारण करण्याच्या उद्देशाने सर्व नगरसेवक आणि राजकीय नेते आपापल्या विभागातील नागरिकांनी बांधकामे करा, शासनस्तरावर ही बांधकामे नियमितीकरणाचा प्रस्ताव मंजूर होणार आहे. त्यामुळे अनधिकृत बांधकामांना नेत्यांची फूस आहे. नवनगर विकास प्राधिकरणाच्या संपादित जागांवर मोठ्या प्रमाणावर नवीन आणि वाढीव बांधकामे सुरू आहेत. वाल्हेकरवाडीतील आहेरनगर, चिंचवडेनगर, गुरूद्वारा, रावेत, पेठ क्रमांक ३०, ३१, ३२ येथे बांधकामे सुरू आहेत. अनियंत्रितपणे ही बांधकामे सुरू आहेत. मात्र, प्राधिकरण प्रशासनाचे याकडे लक्ष नाही. सायली पार्क, स्पाईन रस्त्याजवळ प्राधिकरणाच्या प्रकल्पांचे काम सुरू आहे. त्यासमोरच मोठ्या प्रमाणावर बांधकामे सुरू आहेत. बिजलीनगर, चिंचवडेनगरासह परिस्थिती थेरगाव, काळेवाडीत आहे. मुख्य रस्ते अंतर्गत सोसायट्यांमध्ये वाढीव आणि नवीन बांधकामे सुरू आहेत. त्याकडे प्राधिकरणाच्या अतिक्रमण विभागाचे दुर्लक्ष होत आहे. चिंचवडनगर, वाल्हेकवाडी परिसरात अतिक्रमण विरोधी पथकांची गाडी दररोज फिरते. मात्र, तोडपाणी करून कर्मचारी अतिक्रमणांना नोटीस देत नाहीत. मजलेच्या मजले चढत असताना अतिक्रमण विभाग केवळ हातावर हात ठेवून काम करीत आहेत. हे कर्मचारी अतिक्रमणांवर कारवाई करण्यापेक्षा प्रोत्साहन देत आहेत, अशी तक्रार केली जात आहे.(प्रतिनिधी)
राजाश्रयाने अनधिकृत बांधकामे
By admin | Published: November 18, 2016 5:08 AM