पिंपरी : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर मावळातील ओझर्डे येथील ट्रॉमा सेंटरच्या आवारात अनधिकृतपणे हॉटेल, फुड मॉल, शॉपिंग सेंटर उभे केले आहेत. याची चौकशी करावी, अशी मागणी खासदार श्रीरंग बारणे यांनी केली आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर मोठ्या संख्येने अपघात होत असतात. सर्वाधिक अपघात होणारा हा महामार्ग असून, या मार्गावर होणाऱ्या अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना तत्काळ प्राथमिक वैद्यकीय सेवा मिळावी, म्हणून कॉँग्रेस, राष्ट्रवादी आघाडीच्या कालखंडातील राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या माध्यमातून ट्रॉमा सेंटर बांधण्याचे काम एका खासगी ठेकेदाराला दिले होते.
सदरचे ट्रॉमा सेंटर बांधण्यास अनेक वर्षे लागली. संबंधित ठेकेदाराने ट्रॉमा सेंटरच्या जागेमध्ये अनेक अनधिकृतपणे हॉटेल, फुडमॉल, शॉपिंग सेंटर उभे केले आहेत. या ट्रॉमा सेंटरलगत अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना ने-आण करण्यासाठी हेलिपॅड बांधले असून सदर हेलिपॅड म्हणजे या फुडमॉलची र्पाकिंगची व्यवस्था झाली आहे. अशी टीकाही त्यांनी केली आहे. याबाबत खासदार बारणे यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत मंत्रालयात भेट घेऊन या ट्रॉमा सेंटरमध्ये झालेल्या अनधिकृत कामाची चौकशी करून यामध्ये झालेली अतिक्रमणे हटविण्याची मागणी केली. ट्रॉमा सेंटरच्या मूळ उद्देशाला हरताळ फासला असून, ट्रॉमा सेंटरमध्ये झालेल्या अनधिकृत बांधकामाची चौकशी करावी. द्रुतगती महामार्गावर अपघातात जखमी झालेल्या रुग्णांना ट्रॉमा सेंटरचा लाभ व्हावा, अशी मागणीही केली.