वडगाव मावळ : वडगाव-खडकाळा गट जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सर्वसाधारण जागेसाठी असल्यामुळे या गटामध्ये प्रामुख्याने रंगतदार लढत होण्याची दाट शक्यता आहे. तालुक्यातील वडगाव हे प्रमुख ठिकाण असल्यामुळे या गटामध्ये सर्वच पक्षातील इच्छुकांची संख्या जास्त आहे. शहरी आणि ग्रामीण भागात विभागलेल्या या गटातील विकास असंतुलित झाल्याचे जाणवत आहे.येथे अनेक वर्षांपासून भाजपची सत्ता असून, भाजपला मानणारा वर्ग या परिसरात मोठ्या प्रमाणात आहे. गटातील लोकसंख्या ५४२१२ असून, यामध्ये वडगाव गणाची लोकसंख्या २८२६७, तर खडकाळा गणाची लोकसंख्या २५९४८ इतकी आहे. मागील पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये या गटामधून भाजपाचे उमेदवार निवडून आले आहेत. आता गट सर्वसाधारण जागेसाठी असल्यामुळे व इतर पक्षांची ताकत या गटामध्ये काही प्रमाणात वाढली असल्यामुळे राजकीय समीकरणात बदल होण्याची शक्यता आहे. हा गट शहरी आणि ग्रामीण असा विभागाला गेला आहे. या गटामध्ये वडगाव, नाणोली, आंबी, राजपुरी, आकुर्डी, कातवी, साते, मोहितेवाडी, बौर, ब्राह्मणवाडी, चिखलसे, अहिरवडे, साई, पारवाडी, खडकाळा, खामशेत, कान्हे, नायगाव, जांभूळ, सांगावी, कुसगाव खुर्द या गावांचा समावेश होतो. सत्ताधारी भाजपासह राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, कॉंग्रेस या प्रमुख पक्षांनी उमेदवारांची चाचपणी सुरु केली असून, इच्छुकांनी मुलाखती दिल्या आहेत. या गटात सर्वच पक्षांना अपक्ष आणि बंडखोरांचा फटका बसण्याची शक्यता आहे. (वार्ताहर)
शहरी, ग्रामीण भागामुळे असंतुलित विकास
By admin | Published: January 24, 2017 2:10 AM