लोकमत न्यूज नेटवर्कनिगडी : बेशिस्त वाहनचालकांकडून वाहतुकीचे नियम कायमच धाब्यावर बसविण्यात येतात. झेब्रा क्रॉसिंगचा नियमच माहीत नसल्यासारखे काही उद्दाम वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगवर वाहने उभी करतात. मग पादचाऱ्यांनी रस्ता ओलांडायचा कसा? असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडत आहे.वाहतूक विभागाने घालून दिलेल्या नियमांची सर्रास पायमल्ली करणारे अनेक बेशिस्त वाहनचालक दररोज दिसतात. शहराचे प्रवेशद्वार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निगडीत असे बेशिस्त वाहनचालक मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत. सकाळपासून ते रात्रीपर्यंत निगडीतील भक्ती-शक्ती चौक व (कै.) मधुकर पवळे उड्डाण पूल या ठिकाणी वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. परंतु बहुतांश वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगच्या आतमध्ये आपले वाहन न थांबवता झेब्रा कॉसिंगवर अथवा पुढे वाहने थांबवितात. यामुळे सध्या वाहनचालकांकडून झेब्रा कॉसिंग हा वाहतुकीचा नियम धाब्यावर बसविला जात आहे. झेब्रा क्रॉसिंग या वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर वाहतूक पोलीस कडक कारवाई करत नसल्याने अशा बेशिस्त वाहनचालकांच्या संख्येत वाढ होत आहे, असे सुज्ञ नागरिकांचे म्हणणे आहे. नियमानुसार झेब्रा क्रॉसिंगच्या ठिकाणी वाहनचालकांना थांबणे जरुरीचे असते; मात्र अनेक वाहनचालक नियम धाब्यावर बसवून वाहने चालवत असतात. त्याचे परिवर्तन अपघातात होत असते. हे अपघात टाळण्यासाठी वाहतूक विभागाने विशेष मोहीम राबविणे गरजेचे आहे. झेब्रा क्रॉसिंगवरून रस्ता ओलांडणे हा पादचाऱ्यांचा हक्क आहे. अनेकवेळा वाहनचालक झेब्रा क्रॉसिंगजवळ थांबत नसल्याने पादचाऱ्यांचे हाल होत असतात. त्यांना रस्ता ओलांडताना त्रास होतो.
बेशिस्त वाहनचालकांची मुजोरी
By admin | Published: May 13, 2017 4:40 AM