पिंपरी : मामा मूळगावी जाऊ देणार नाही, म्हणून दोन भावांनी अपहरणाचा बनाव केला. मात्र, पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण करून हा बनाव उघड केला. तसेच, मामा, भाचा आणि मामाचा १७ वर्षीय विधीसंघर्षीत मुलगा, असे तिघांच्याही विरोधात निगडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिंचवड येथे गुरुवारी (दि. १७) सकाळी ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अपहरणाचा बनाव केलेला भाचा हा त्याचा मामा असलेल्या आरोपीकडे चिखली येथे राहण्यास आहे. आरोपी भाच्याचे काही जणांनी चिंचवड येथून अपहरण केले आहे, असा फोन करून आरोपी मामाने पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपहरण झालेला माझा भाचा असून, त्याच्यासोबत माझा विधिसंघर्षित मुलगा आहे, असेही आरोपी मामाने पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी विधिसंघर्षित बालकाला ताब्यात घेतले.
आम्ही दोघे घरून दुचाकीवरून कंपनीकडे कामावर जात असताना चिंचवड येथे काही जणांनी आमची दुचाकी थांबवली. त्यानंतर मला धक्का देऊन माझ्या भावाला त्यांच्या चारचाकी वाहनात बसवून परशुराम चौकाच्या दिशेने निघून गेले. त्यांचा मी पाठलाग केला, मात्र ते वाहन वेगात घेऊन मोहननगरच्या दिशेने गेले. त्यानंतर तेथून मी कंपनीत आलो आणि माझ्या वडिलांना फोन करून याबाबत सांगितले, असे विधिसंघर्षित बालकाने पोलिसांना सांगितले. त्यानंतर निगडी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. त्यात चारचाकी वाहन त्या रस्त्यावरून जाताना दिसले. मात्र त्यात पाच ते सहा इसम दिसून आले नाहीत. तसेच विधिसंघर्षित बालक हा त्या वाहनाचा पाठलाग करताना दिसून आला नाही. तसेच पोलिसांनी आरोपी भाचा याच्या मित्रांकडे चौकशी केली असता असा कोणताही प्रकार झाला नसल्याचे समोर आले. तसेच पोलिसांनी आरोपी भाचा याचे मोबाइल लोकेशन तपासले असता, ते अजंठानगर, चिंचवडला मिळून आले. तेथून त्याला ताब्यात घेतले.
मला माझ्या मूळगावी जायचे होते व माझा मामा मला जाऊ देणार नाही, म्हणून आम्ही दोघांनी माझ्या अपहरणाचा बनाव रचला होता, असे आरोपी भाच्याने पोलिसांना सांगितले. त्यानंतर हा अपहरणाचा बनाव उघडकीस आला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.