पिंपरी : केंद्र आणि राज्य शासनाच्या स्वच्छ भारत अभियानाअंतर्गतपिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात हगणदारी मुक्त शहराचे सर्वेक्षण सुरू झाले आहे. ओडीएफ प्लस-प्लस असे सर्वेक्षण सुरू झाले असून राज्य सरकारचे पथक शहराची पाहणी करीत आहे. त्यानंतर हगणदारी मुक्त शहराचे मानांकन ठरणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेला ओडीएफ प्लस मानांकन मिळाले आहे. हगणदारी मुक्त शहरासाठी दर सहा महिन्याला सर्वेक्षण करण्यात येते. स्वच्छ भारत अभियानात शहराची पिछाडी झाल्याने मोठ्याप्रमाणावर टीका झाली होती. मानांकन वाढावे, यासाठी सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वतीने प्रयत्न सुरू केले आहेत. शहरात बुधवारपासून सर्वेक्षण सुरू झाले आहे. सर्वेक्षण करणारे पथक दाखल झाले असून सार्वजनिक ठिकाणी प्रात:विधीस नागरिक जातात का? सार्वजनिक स्वच्छतागृहांची अवस्था काय आहे. सांडपाणी आणि मैला यावर प्रक्रिया करणारे एसटीपी प्रकल्पांची सद्य:स्थिती काय आहे, याची पाहणी हे पथक करीत आहेत. पथकातील अधिकारी हे अचानकपणे घटनास्थळी येत असल्याने त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभाग, आणि प्रभाग अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. ..........................
माहिती अपलोड करण्याचे काम सुरू पथकातील अधिकारी हे प्रत्यक्ष स्थळाची पाहणी करून एका स्वच्छतागृहाचे किमान ६० छायाचित्रे टिपून ती सर्वेक्षणासाठी तयार केलेल्या संकेतस्थळावर अपलोड करीत आहेत. त्यामुळे आपला प्रभाग, झोपडपट्यांच्या परिसरात हगणदारी वाढू नये, यासाठी आरोग्य विभागाचे कर्मचारी सज्ज आहेत.