पिंपरी : पिंपरी कॅम्पातील साई चौक येथे बेशिस्तरीत्या रस्त्यावर उभ्या केलेल्या २७ वाहनांना वाहतूक पोलिसांनी जॅमर लावत वाहचालकांकडून दंड वसूल केला. शुक्रवारी ही कारवाई करण्यात आली.पिंपरी-चिंचवड शहरातील मोठी बाजारपेठ अशी ओळख असलेल्या पिंपरी कॅम्पात खरेदीसाठी नागरिकांची नेहमीच मोठी गर्दी असते. शहरासह लगतच्या भागातील नागरिकदेखील येथे खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे कॅम्पातील शगुन चौक, साई चौक, कराची चौक या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. मात्र, खरेदीसाठी येणारे अनेकजण आपली वाहने बेशिस्तरीत्या पार्किंगच्या पट्ट्याबाहेर उभी करतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होतो. बेशिस्त वाहनचालकांमुळे पिंपरी कॅम्पातील वाहतूककोंडी नित्याची बाब झाली आहे. अशा बेशिस्त वाहनचालकांवर शुक्रवारी वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात आला. साई चौकात बेशिस्तरीत्या रस्त्यावरच अस्ताव्यस्तपणे उभ्या केलेल्या २७ वाहनांना जॅमर लावण्यात आले. तसेच त्यांच्याकडून दंडही वसूल करण्यात आला.यासह या परिसरातील वाहतूक कोंडीमध्ये येथील दुकानदारांकडूनही भर घातली जाते. दुकानात विक्रीसाठी ठेवण्यात आलेले साहित्य दुकानासमोरील पदपथासह थेट रस्त्यावरही मांडले जाते. त्यामुळे वाहतूककोंडीत अधिकच भर पडते. अशा बेशिस्त दुकानदारांनाही पोलिसांकडून सूचना देण्यात आल्या.
बेशिस्त चालकांवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 05, 2017 3:39 AM