पिंपरी : काळभोरनगर प्रभाग २६ ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी सर्व नेत्यांना भेटा, अशी सूचना राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दोन दिवसांपूर्वीच केली असताना चर्चा होण्यापूर्वीच भाजपाने या प्रभागातून उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोध करण्याची आशा मावळली आहे.काळभोरनगर प्रभागातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश टेकावडे यांचा खून झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. त्यात टेकावडे यांच्या पत्नी सुजाता यांना निवडणूक रिंगणात उतरविण्याची घोषणा राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी मागील आठवड्यात केली होती. दोनच दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या बैठकीत ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न करा. काँग्रेस, भाजपा, शिवसेना, मनसेच्या नेत्यांना भेटून भूमिका सांगा, अशी सूचना पवार यांनी कार्यकर्त्यांना दिली होती. काँग्रेसबरोबरच चर्चा झाली असून, ते उमेदवार देणार नाहीत, अशी माहितीही दिली होती. दरम्यान, आज भारतीय जनता पक्षाने काँग्रेसमधून आलेल्या गणेश लंगोटे यांना उमेदवारी जाहीर करून राष्ट्रवादीचा मनसुबा धुळीस मिळविला आहे. त्यामुळे निवडणूक बिनविरोधची आशा मावळली आहे.गणेश लंगोटे भाजपात विद्यार्थिदशेपासून युवक काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले काँग्रेस पक्षाचे पिंपरी विधानसभा ब्लॉकचे अध्यक्ष गणेश लंगोटे यांनी समर्थकांसह भाजपात प्रवेश केला. त्यांची उमेदवारी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांनी जाहीर केली. पक्षाच्या खराळवाडी येथील कार्यालयात खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, राज्य लोकलेखा समितीचे अध्यक्ष सचिन पटवर्धन, पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख एकनाथ पवार, शैला मोळक, राजू दुर्गे, माऊली थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत लंगोटे यांनी पक्षात प्रवेश केला. या वेळी लक्ष्मण कोंडे, सूरज माने, गणेश शेलार, झेवियर अॅँथोनी, कुमार लंगोटे, योगेश लंगोटे, उदय नामदे आदी उपस्थित होते.(प्रतिनिधी)
बिनविरोध निवडीचा फसला डाव
By admin | Published: December 21, 2015 12:30 AM